गुंतवणुकीच्या नावाने सव्वासहा कोटीचा अपहार करुन फसवणुक
मालाड येथील घटना; चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदतीची विनंती करुन कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका इमिटेशन ज्वेलरी व्यापार्याची चारजणांच्या टोळीने सुमारे सव्वासहा कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यापार्याच्या तक्रार अर्जावरुन मालाड पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राकेश अग्रवाल, मनिषा अग्रवाल, मयंक अग्रवाल आणि हरिभाई अशी या चौघांची नावे असून लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
सुरजीतसिंग लालसिंग हे अंधेरी येथे राहत असून त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांची अग्रवाल कुटुंबियांशी ओळख झाली होती. त्यांचाही इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. मे २०१६ रोजी राकेश अग्रवालने त्यांना त्याच्या इमिटेशन ज्वेलरी व्यवसायात गुंतवणुकीची एक स्किम सांगितली होती. या गुंतवणुकीवर त्यांना ३४ ते ३५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अग्रवाल कुटुंबियांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी अग्रवाल कुटुंबियांच्या सिल्व्हर आर्टस, वर्धान ज्चेलर्स या कंपनीत अडीच कोटीची गुंतवणुक केली होती. काही दिवसांनी व्यवसाय वाढीसाठी तसेच चांदी निर्यातीसाठी त्यांना आणखीन गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे आणखीन पाच कोटी बारा लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
अशा प्रकारे मे २०१६ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्यांनी त्यांच्या कंपनीत ७ कोटी ६२ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना १ कोटी ३४ लाख रुपये परताव्यासह रक्कम देण्यात आली होती. मात्र नंतर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे सुरजीतसिंग यांनी अग्रवाल कुटुंबियांकडे त्यांनी केलेल्या केलेल्या उर्वरित ६ कोटी २७ लाख रुपयांच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र ते सर्वजण विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राकेश अग्रवाल, मनिषा अग्रवाल, मयंक अग्रवाल आणि हरिभाई या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या चौघांनी अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.