१०.३३ कोटीच्या सोने, विदेशी चलनासह सात प्रवाशांना अटक
चार दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – विदेशातून चोरट्या मार्गाने आणलेल्या गोल्ड डस्टसह महागडे इलेक्ट्रॉनिक सामान आणि बँकॉंकला विदेशी चलन घेऊन जाणार्या दोन विदेशी नागरिकासह सात प्रवाशांना वेगवेगळ्या कारवाईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. चार दिवसांत केलेल्या या कारवाईत या अधिकार्यांनी १० कोटी ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात सोन्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विदेशी चलनाचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्व प्रवाशांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत विदेशातून सोन्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे विदेशात येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची सीमा शुल्क विभागाने कसून तपासणी सुरु केली होती. १० जुलै ते १४ जुलै २०२४ या कालावधीत या तपासणीदरम्यान या अधिकार्यांनी सात प्रवाशांना अटक केली होती. त्यात दोन विदेशी नागरिकांचा समावेश होता. ते दोघेही बँकॉंकला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांनी त्यांच्या लॅपटॉपच्या कप्यात एक चोर कप्यात विदेशी चलन लपवून आणले होते. या बॅगेतून या अधिकार्यांनी ७३०० युरो, २५०० अमेरिकन डॉलर, पाऊंड, न्यूझीलंड डॉलर असा ४४ लाख ७६ हजार रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. विदेशी चलनाची तस्करी केल्याप्रकरणी या दोन्ही विदेशी नागरिकांना नंतर अटक करण्यात आली. उत्तरप्रदेश आणि झारखंडचे रहिवाशी असलेल्या दोन प्रवाशांना अशाच एका कारवाईत या अधिकार्यांनी अटक केली. या दोघांकडून १ किलो ९५० ग्रॅम वजनाची गोल्ड डस्ट या अधिकार्यांनी जप्त केले. ही डस्ट त्यांनी मेणात वितळवून आणली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी विमानाच्या प्रशासनगृहातील नळाच्या खाली लपवून आणलेले ३ किलो १९९ ग्रॅम वजनाचे गोल्ड डस्ट जप्त केली. त्याची किंमत १ कोटी ८९ लाख रुपये इतकी आहे.
यापूर्वी या अधिकार्यांनी आबूधाबी, दुबई, बेहरीन येथून आलेल्या सोळा भारतीय प्रवाशांना अटक केली होती. या प्रवाशांनी विदेशात चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणले होते. त्यांच्याकडून या अधिकार्यांनी दोन कोटी सोळा लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केले. हा माल बॅग, कागदाचे थर आणि शरीरात लपवून आणण्यात आले होते. तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या सर्वांना नंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.