मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करुन तरुणीची बदनामी
वडाळ्यातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२४
मुंबई, – मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन एका २० वर्षांच्या तरुणीची बदनामी झाल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन वडाळा टी टी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या घटनेमागे तक्रारदार तरुणीच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
तक्रारदार तरुणी ही तिच्या आई-वडिल आणि दोन भावासोबत वडाळा परिसरात राहत असून एका आरोग्यवर्धक क्लिनिकमध्ये कामाला आहे. सोमवारी १५ जुलैला दुपारी अडीच वाजता तिला तिच्या इंटाग्रामवर एका अज्ञात व्यक्तीने फे्रंड रिक्वेस्ट पाठविली होती. मात्र तिने ती रिक्वेस्ट स्विकारली नाही. त्यानंतर त्याच आयडीवरुन तिला संबंधित व्यक्तीने एक मॅसेज पाठविला होता. तो तिला कॉल करण्यास सांगत होता. मात्र तिने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर संबंधित व्यक्तीने तिला पूजाला त्याच्याकडे पाठविले नाहीतर तो तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते. रात्री पावणेअकरा वाजता ती तिच्या घरी होती. यावेळी तिला तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो तिच्या इंटाग्रामवर अपलोड झाल्याचे दिसून आले. अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याने तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने संबंधित अकाऊंट ब्लॉक करुन घडलेला प्रकार तिच्या भावाला सांगितला. या घटनेनंतर तिच्या भावाने त्याला रिप्लाय करुन तो कुठे राहतो याबाबत विचारणा केली. यावेळी त्याने त्याला तुझ्या बहिणीने मला ब्लॉक केले आहे, तिला आधी ब्लॉक काढण्यास सांग असा रिप्लाय देऊन तो वडाळा संगमनगर येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या भावाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले.
यावेळी त्याने त्याला त्याच्याकडे तिच्या बहिणीचे फोटो आणि व्हिडीओ असून ते सर्व एडीट करुन व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिचे पुन्हा अश्लील मॉर्फ केलेेले फोटो पाठवून दिले होते. या प्रकारानंतर तो त्याच्या बहिणीसोबत पोलीस ठाण्यात आला आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ७७ भारतीय न्याय संहिता सहकलम ६७, ६७ अ आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. सायबर सेलचे अधिकारी संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.