विक्री केलेल्या मालाच्या पंधरा लाखांचा अपहार

बोरिवलीतील घटना; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२४
मुंबई, – स्टोरमधून विक्री केलेल्या सुमारे पंधरा लाखांच्या पेमेंटवर कंपनीच्या मॅनेजरने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरिवलीतील स्टोरचा मॅनेजर गणेश सुनिल नाईक याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

श्रीनिवास धनंजय जक्कानी हे चेंबूर येथे राहत असून जस्ट डॉग्स पालॉन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ट्रेनिंग मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यांची कंपनी कुत्रा आणि मांजर यांच्या खाण्यासह त्यांना लागणार्‍या इतर वस्तूची विक्री करते. गुजराच्या अहमदाबाद येथे कंपनीचे मुख्य कार्याय असून देशभरात ३६ हून अधिक स्टोअर्स आहेत. त्यापैकी एक स्टोर बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात आहे. याच ठिकाणी जुलै २०२२ पासून गणेश नाईक हा मॅनेजर म्हणून कामाला होता. काही दिवसांनी त्यांच्या स्टोअरच्या मालाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात विक्री आणि खरेदी केलेल्या मालामध्ये सुमारे २२ लाखांची तफावत दिसून आली होती. हा प्रकार संबंधित अधिकार्‍यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितली होती. त्याची गंभीर दखल घेत या अधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याच दरम्यान गणेश नाईक हा अचानक काम सोडून निघून गेला होता. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्यामागे गणेशचा सहभाग असावा अशी शंका व्यक्त करुन या अधिकार्‍यांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

चौकशीदरम्यान गणेश नाईकने त्यानेच स्टोरच्या मालाची परस्पर विक्री करुन ती रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याची कबुली दिली होती. बँक स्टेटमेंटची तपासणी केल्यानंतर त्याच्या बँक खात्यात जुलै २०२२ ते मे २०२४ या कालावधीत १५ लाख २१ हजार ५१३ रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने श्रीनिवास जक्कानी यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गणेश नाईकविरुद्ध पोलिसांनी ४०८, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page