मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२४
मुंबई, – लिफ्टमध्ये एकटीच असल्याची संधी साधून एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच परिचित व्यक्तीने विनयभंग केला. मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ आणि फोटो दाखवून त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
४२ वर्षांचे तक्रारदार मालाड येथे राहत असून बळीत त्यांची दहा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजता घरगुती सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती. सामान घेऊन ती घरी जात होती. लिफ्टमध्ये जाताना तिच्यासोबत तिच्या परिचित व्यक्ती होता. लिफ्टमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिला त्याच्या मोबाईलमधील काही अश्लील व्हिडीओ आणि फोटो दाखवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर ती तिच्या वडिलांसोबत जाताना तिच्यासमोर अचानक आरोपी आला होता. यावेळी त्याला पाहून ती रडू लागली. अचानक रडण्याबाबत तिच्या वडिलांनी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच त्यांना धक्काच बसला होता. याच दरम्यान आरोपी तेथून पळून गेला होता. सोमवारी ते त्यांच्या मुलीसोबत दिडोंशी पोलीस ठाण्यात आले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.