मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – बँक समूहाची सुमारे ९७५ कोटीची आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या मंधाना इंडस्ट्रिजचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम छगनलाल मंधाना यांना गुरुवारी अंमलबजावणी सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अलीकडेच ईडीने कंपनीशी संबंधित ठिकाणी छापेमारी करुन कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर पुरुषोत्तम मंधना यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. आगामी दिवसांत आणखीन काही बड्या अधिकार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे.
बँक ऑफ बडोदाच्या बँक समूहाची ९७५ कोटीची आर्थिक फसवणुक झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाले होते. तपासात ही बाब उघडकीस येताच ईडीने मंधाना इंडस्ट्रिजसह पुरुषोत्तम मंधाना, मनिष मंधाना, बिहारीलाल मंधाना आणि इतर आरोपीविरुद्ध फसवणुकीसह मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. बॅक समूहाची ही रक्कम नंतर इतर ठिकाणी वळविण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच जून आणि जुलै महिन्यांत ईडीने मुंबईसह इतर बारा ठिकाणी अचानक छापेमारी केली होती. या छाप्यात १४० हून अधिक बँक खाती, पाच लॉकर्स, पाच कोटीचे शेअर, सुरक्षा ठेवी, बँक खाती आणि लॉकर्स गोठविताना मर्सिडीज, लेक्सससारख्या महागड्या गाड्या आणि रोलेक्स, हब्लॉटसह अनेक महागडी घड्याळे जप्त केली होती. या प्रकरणात पुरुषोत्तम मंधानी यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटक्ेनंतर त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.