मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – हैद्राबाद येथून आणलेल्या दहा कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत आंतरराज्य ड्रग्ज तस्करी टोळीशी संबंधित एका मुख्य आरोपीस नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. एम. एस खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून या अधिकार्यांनी पाच किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्ज तस्करी करणारी ही टोळी असून या टोळीशी संबंधित इतर आरोपींच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
एमडी ड्रग्जशी संबंधित एका आंतरराज्य टोळीची माहिती अलीकडेच एनसीबीच्या मुंबई युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या टोळीशी संबंधित काही मुख्य आरोपी इतर राज्यातून आणलेल्या एमडी ड्रग्जची विक्रीसाठी शीव परिसरात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त संचालक अमीत घावटे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने गुरुवारी शीव सर्कल परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या एम. एस खान नावाच्या एका संशयिताला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत या अधिकार्यांना पाच किलो वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात दहा कोटी रुपये इतकी किंमत आहे. तपासात खान हा अंधेरी येथे राहत असून एमडी ड्रग्ज तस्करीच्या आंतरराज्य टोळीचा तो सदस्य असल्याचे उघडकीस आले. त्याने ते एमडी ड्रग्ज हैद्राबाद येथून आणले होते. त्याची तो मुंबईत विक्री करणार होता. ते ड्रग्ज तो कोणाला देणार होता, याकामी त्याला किती रुपयांचे कमिशन मिळणार होते, त्यापूर्वीही एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे याचा एनसीबीचे अधिकारी तपास करत आहेत. त्याच्या चौकशीतून इतर काही सहकार्यांचे नाव समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.