गुन्हा दाखल होण्यापूर्वीच घरफोडीच्या गुन्ह्यांतील महिलेस अटक

चोरीचा ३० लाख ४५ हजाराचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जुलै २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – मालाड येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांत शीतल अरुण उपाध्याय नावाच्या एका ३८ वर्षांच्या महिलेस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी चोरीचे ३० लाख ४५ हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि पत्तीस हजार रुपयांची कॅश हस्तगत केली आहे. या वृत्ताला सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे यांनी दुजोरा दिला आहे.

तक्रारदार वयोवृद्ध महिला सोनिया रमेश मिरचंदानी ही मालाडच्या एव्हरशाईननगर, नालंदा सोसायटीमध्ये राहते. तिला दोन मुले असून त्यापैकी तिची विवाहीत मुलगी शालिनी बिजलानी ही तिच्या पतीसोबत वांद्रे येथे राहते तर मुलगा करण मिरचंदानी हा कामानिमित्त कॅनडा येथे राहतो. शुक्रवारी १९ जुलैला सायंकाळी पाच वाजता ती त्याच परिसरात असलेल्या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेली होती. सायंकाळी पावणेसात वाजता ती घरी आली होती. यावेळी तिला तिच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपयांची कॅश असा ३० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार निदर्शनास येताच तिने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना ही माहिती दिली. यावेळी मालिनी कपूर या ७४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने परिसरात गस्त घालणार्‍या पोलिसांनी एका महिलेला पकडून पोलीस ठाण्यात नेल्याचे सांगितले. त्यामुळे सोनिया मिरचंदानी या बांगुरनगर पोलीस ठाण्यात गेल्या आणि त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याची माहिती सांगितले.

तिच्या तक्रार अर्जानंतर बांगुरनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता. चौकशीदरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेनेच तिच्या घरात प्रवेश करुन ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिला घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. शितल उपाध्याय असे महिलेचे नाव असून ती कुर्ला येथील बैलबाजार परिसरात राहते. शुक्रवारी सायंकाळी ती मालाड येथे आली होती. सोनिया मिरचंदानी यांच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिने फ्लॅटमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून गुन्ह्यांतील सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page