रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त पोलीस अधिकार्याला गंडा
गोवंडीतील घटना; आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जुलै २०२४
मुंबई, – महाराष्ट्र पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाची सुमारे १२ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. या पोलीस अधिकार्यांच्या दोन्ही मुलांना रेल्वेत कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गणेश कशिनाथ राणे या आरोपीविरुद्ध गोवंडी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
सुरेश बबन गायकर (६८) हे अहमदनगरच्या अकोले, ब्राह्मणवाडा परिसरात त्यांच्या पत्नी दोन मुलांसोबत राहतात. ते महाराष्ट्र पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. पूर्वी ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहत होते. यावेळी त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख गणेश राणेशी करुन दिली होती. या ओळखीत गणेशने तो रेल्वेमध्ये नोकरीस असून त्याने आतापर्यंत अनेक गरजू बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी मिळवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे सुरेश गायकर यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी नोकरी मिळवून देण्याची गणेशकडे विनंती केली होती. यावेळी त्याने रेल्वेत लवकरच क्लार्क पदासाठी भरती होणार असून त्यासाठी तो प्रत्येक उमेदवारामागे सहा लाख रुपये कमिशन म्हणून घेणार असल्याचे सांगितले. रेल्वेत कायमस्वरुपी नोकरी मिळत असल्याने त्यांनीही त्यास होकार दिला होता. काही दिवसांनी गणेशने त्यांच्या दोन्ही मुलांचे कागदपत्रांसह बारा लाख रुपये घेतले होते. यावेळी त्याने नोकरीसाठी त्यांचे अर्ज भरले नव्हते, तरीही तीन महिन्यांत त्यांना नोकरीचा कॉल लेटर येईल असे सांगितले. मात्र तीन महिने उलटूनही त्यांच्या दोन्ही मुलांना कॉल लेटर आले नव्हते. त्यामुळे त्यांनी गणेशकडे विचारणा केली असता तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
२०१५ साली ते गणेशच्या डोबिवलीतील राहत्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी गणेशकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्याने त्यांना प्रत्येकी सहा लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते. मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे ते पुन्हा गणेशच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी एका स्ॅटम्प पेपर नोकरीसाठी बारा लाख रुपये घेतल्याची कबुली देताना त्यांना पुन्हा दोन धनादेश दिले होते. मात्र त्याने दिलेले दुसरे धनादेशही बँकेत न वटता परत आले होते. त्यानंतर तो घराला टाळे लावून पळून गेला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोवंडी पोलिसात गणेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या गणेशचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून गणेशने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्याच्या अटकेनंतर त्याने आतापर्यंत किती तरुणांना नोकरीचे आमिष दाखविले आहे, त्यांच्याकडून नोकरीसाठी किती रुपये घेतले आहेत याचा उलघडा होणार आहे.