बोगस अकाऊंटद्वारे विद्या बालनच्या नावाचा गैरवापर करुन फसवणुक
विद्या बालन बोलत असल्याचे भासवून अनेकांना कामासाठी संपर्क साधल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४
मुंबई, – जीमेलवर बोगस अकाऊंट उघडून सिनेअभिनेत्री विद्या बालन हिच्या नावाचा गैरवापर करुन फसवणुक होत असल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. विद्या बालन बोलत असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने तिच्या परिचितासह अनेकांना बॉलीवूडमधील कामासाठी संपर्क साधल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल सायबर सेल पोलिसांना संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्या बालन ही सिनेअभिनेत्री असून ती तिच्या निर्माता पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत वांद्रे येथील कार्टर रोड, सँड्स अपार्टमेंटमध्ये राहते. बॉलीवूडच्या नामांकित अभिनेत्रीमध्ये विद्या बालनचे नाव घेतले असून तिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका निभावल्या आहेत. त्यासाठी तिला काही पुरस्कारही मिळाले आहेत. तिचा प्रणय नावाचा एक मित्र असून तो बॉलीवूडमध्ये स्टायलिश म्हणून काम करतो. १६ जानेवारीला त्याला एका अज्ञात व्हॉटअप क्रमांकावर एक मॅसेज आला होता. तो मॅसेज स्वत विद्या बालनने पाठविल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने त्याला कामासंदर्भात चर्चा करायची आहे असे सांगितले होते. मात्र व्हॉटअटवरुन आलेला मॅसेज विद्या बालनचा नसल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने ही माहिती विद्या बालनला फोनवरुन सांगितली होती.
दुसर्या दिवशी तिला अशाच प्रकारे तिच्या संपर्कातील इतर काही लोकांनी व्हॉटअपवरुन मॅसेज आल्याचे समजले होते. तिच्या नावाने या अज्ञात व्यक्तीने इंटाग्राम आणि जीमेलवर बोगस अकाऊंट उघडले होते. या अकाऊंटवरुन संबंधित व्यक्तींना मॅसेज पाठवून तो मॅसेज विद्या बालन हिनेच पाठविल्याचे भासविण्यात येत होते. या सर्वांना बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी असल्याचे सांगून कामासंदर्भात चर्चा करायची आहे, त्यांना बॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
हा प्रकार लक्षात येताच विद्या बालनने तिची मॅनेजर आदिती संधू हिच्यामार्फत खार पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. २० जानेवारीला हा अर्ज प्राप्त होताच खार पोलिसांनी त्याची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर विद्या बालनची खार पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेल पोलिसांकडून सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.