उत्तरप्रदेशातून आणलेल्या कोडीन औषधांसह तिघांना अटक
उल्हासनगरात एनसीबीची कारवाई; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – उत्तरप्रदेशातून आणलेल्या कोडीन औषधांच्या तस्करीप्रकरणी एका आंतरराज्य टोळीचा मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने पर्दाफाश केला. याप्रकरणी उल्हासनगर येथून तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन हजार कोडीनच्या बाटल्या जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये इतकी आहे. एस. आर अहमद, एम. अस्लम आणि वाय खान अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांसह एनसीबीने ड्रग्ज तस्कराविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत अनेक ड्रग्ज तस्करांना अटक करुन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यातच ड्रग्जची किंमत जास्त असल्याने काही नशेबाज गांजा, चरस, एमडी, हशीशला पर्याय म्हणून व्हाईटनर आणि कोडीनचे व्यसन करतात. गेल्या काही दिवसांत अशा नशेबाजांमुळे कोडीनला प्रचंड मागणी होत असल्याचे दिसून आले होते. स्वस्त आणि अधिक वेळ नशा राहत असल्याने अनेक नशेबाज कोडीनचा ड्रग्ज म्हणून सेवन करतात. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोडीन औषध मिळत नसल्याने काही टोळ्या छुप्यारीत्या कोडीनची विक्री करत होती.
कोडीन औषधांची तस्करी करणारी अशीच एक टोळी शहरात कार्यरत असल्याची माहिती मुंबई युनिटच्या एनसीबीच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी काहीजण उल्हासनगर येथे कोडीनचा मोठा साठा घेऊन येणार असल्याची माहिती या अधिकार्यांना प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांची नावे एस. अहमद, वाय खान आणि एम अस्लम असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून या अधिकार्यांनी तीन हजार कोडीन औषधांचा साठा जप्त केला. त्याची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये इतका आहे. औषधांचा हा साठा उत्तरप्रदेशातून आला होता. उल्हासनगर येथे या पार्सलची डिलीव्हरी होणार होती, याच दरम्यान या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तिन्ही आरोपींना अटक करुन हा साठा जप्त केला.
त्यांच्या चौकशीत ते कोडीन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगरच्या झोपडपट्टी परिसरात विक्री करत होते. खासी की दवा, दवा किंवा खो खो या कोडवर्डचा वापर करुन त्याची विक्री केली जात होती. नशेबाज रुमालात ते औषध टाकून त्याचे व्यसन करतात. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली आहे. त्यांची चौकशी सुरु असून त्यांना हा साठा कोणी पाठविला, कोणत्या कंपनीकडून या बाटल्या पाठविण्यात आले. यापूर्वीही त्यांनी कोडेनची विक्री केली आहे का याचा संबंधित अधिकारी तपास करत आहेत.