मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२४
मुंबई, – हवन करताना मंदिरातील महंत माधवाचार्यजी ऊर्फ माधवदासजी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात माधवाचार्यजी यांच्या मानेसह खांद्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी सूर्यनारायण दास व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना मंगळवारी पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास मालाड येथील पठाणवाडी, संकट मोचन विजय हनुमान टेकडी, तपोवन हनुमान मंदिरात घडली. याच मंदिरात महंत माधवाचार्यजी हे मठाधिकारी म्हणून काम करतात. पहाटे साडेचार वाजता ते नेहमीप्रमाणे मंदिरात हवन करत होते. अचानक मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मानेवार तिक्ष्ण हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रसंगावधान दाखवून त्यांनी खाली वाकून हा वार चुकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. हा प्रकार सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच त्याने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याला जोरात धक्का देत तेथून पलायन केले होते. ही माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या माधवाचार्यजी यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरासह सूर्यनारायणदास या दोघांविरुद्ध १०९ (१), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ३७ (१), (अ), १३५ मपोका कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपासात त्यांच्या गौशाळेत सूर्यनारायणदास नावाचा एक कर्मचारी कामाला होता. गाईचे दूध काढून मंदिरात देण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. मात्र तो दूधाची बाहेर परस्पर विक्री करत होता. हा प्रका समजताच महंत माधवाचार्यंजी यांनी त्याला कामावरुन काढून टाकले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने संबंधित व्यक्तीच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला घडवून आणला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या अटकेनंतर या हल्ल्यामागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.