फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस पुण्यातून अटक
गेल्या ३३ वर्षांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस पायधुनी पोलिसांनी अटक केली. पवन गोपीकृष्ण मोदी असे या आरोपीचे नाव असून त्याला माझगाव येथील विशेष सेशन कोर्टाने वॉण्टेड आरोपी घोषित केले होते. गेल्या ३३ वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला सेशल कोर्टात हजर करण्यात आले होते.
पवन मोदी हा खार परिसरात राहत असून त्याच्याविरुद्ध १९९० साली पायधुनी पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यांची नोंद केली होती. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलांच्या मदतीने विशेष सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच पवन मोदी हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्यावर अजामिनपात्र वॉरंट काढून त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. या आदेशात विशेष कोर्टाने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पायधुनी पोलिसांना दिले होते. या आदेशाची अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांना आरोपीचा शोध घेण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस उपनिरीक्षक अनिल वायर, पोलीस हवालदार कैलास भोईटे, इरफान खान, दिपक निकम, पोलीस शिपाई शंकर राठोड, प्रकाश अलदर, नितेश घोडे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
गेल्या ३३ वर्षांपासून पवन हा पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही पोलिसांचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच तो पुण्यातील मुंडवा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने पुण्यातून पवन मोदीला शिताफीने अटक केली. चौकशीत तोच फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत फेरअटक केल्यानंतर त्याला माझगाव येथील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.