बुक केलेल्या फ्लॅटची विक्री करुन ६७ लाखांची फसवणुक
बांधकाम कंपनीच्या दोन्ही संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जुलै २०२४
मुंबई, – तेरा वर्षापूर्वी बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका वयोवृद्ध व्यापार्याची सुमारे ६७ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांधकाम क्षेत्राशी संबंधित एका खाजगी कंपनीच्या दोन्ही संचालकाविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रसीकभाई एच ठक्कर आणि प्रमिला रसिकभाई ठक्कर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही जालियान डेव्हल्पर्स कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
७९ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार वेलजी रनमल शहा हे मालाड परिसरात राहत असून तिथे त्यांच्या मालकीचे एक किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या चारही मुलीचे लग्न झाले असून डॉक्टर असलेली एक मुलगी त्यांच्यासोबत राहते. २०११ रोजी ते स्वतसाठी एक फ्लॅट खरेदीसाठी इच्छुक होते. यावेळी त्यांच्या परिचित मित्राने त्यांना जालियान डेव्हल्पर्स कंपनीच्या एका बांधकाम साईटविषयी माहिती दिली होती. त्यांच्या इमारतीमध्ये त्यांनी फ्लॅटमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्यामुळे ते त्यांच्या मित्रासोबत रसीकभाईला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेले होते. यावेळी रसीकभाईने त्यांना बोरिवलीतील दौलतनगर परिसरात त्याच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. लवकरच भूमीपूजन करुन इमारतीचे बांधकाम सुरु होईल आणि पाच वर्षांत फ्लॅटचा ताबा दिला जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिथेच एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. मार्च २०११ रोजी प्रोजेक्टचे भूमिपूजन झाले होते. या कार्यक्रमाला वेलजी शहा हे स्वत उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये एक ९५० स्न्वेअर फुटाचा फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी त्याला ६७ लाख ९ हजार ८४० रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार होऊन वेलजी शहा यांना सतराव्या मजल्यावर १७०२ क्रमांकाचा फ्लॅट अलोट करण्यात आला होता. मात्र त्यांच्यात रजिस्ट्रर अग्रीमेंट झाले नव्हते.
याच दरम्यान एका नगरसेवकाने तिथे सुरु असलेल्या बांधकामावर स्थगिती आणली होती. त्यामुळे इमारतीचे बांधकाम बंद झाले होते. त्यातच कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाले होते. तरीही वेलजी शहा हे रसीकभाई याच्या संपर्कात राहून फ्लॅटविषयी विचारणा करत होते. जून २०२४ रोजी त्यांना त्यांचा सहकारी प्रसिद्ध यादवने त्यांनी ज्या इमारतीमध्ये सतराव्या मजल्यावर फ्लॅट बुक केला होता, तो फ्लॅट रसीकभाई आणि प्रमिला ठक्कर यांनी परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री केल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली होती. या सुरक्षारक्षकाने त्यांना त्यांचा फ्लॅट विशाल किशोर शहा आणि करिश्मा विशाल शहा यांनी विकत घेतल्याचे सांगितले. बुक केलेल्या फ्लॅटची ठक्कर यांनी परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन त्यांची सुमारे ६७ लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी दिडोंशी पोलीस ठाण्यात फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात आर्थिक फसवणुक झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचे विकासक आणि संचालक रसीकभाई ठक्कर आणि प्रमिला ठक्कर यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी सहकलम महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.