गुंतवणुकीच्या आमिषाने डॉक्टर पिता-पूत्राची फसवणुक

बोरिवलीतील घटना; आरोपीविरुद्ध फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – विविध आकर्षक योजनेत गुंंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका डॉक्टर पिता-पूत्राची त्यांच्याच परिचित व्यावसायिकाने सुमारे ४२ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विकास उत्तमचंद्र जैन या मेडीकल व्यावसायिकाविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात विकास जैन याने तक्रादार पिता-पूत्रासह अनेकांना आकर्षक योजनेचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

६२ वर्षांचे वयोवृद्ध अरुणकुमार कुवरलाल जैन हे व्यवसायाने डॉक्टर असून ते बोरिवली परिसरात त्यांची पत्नी कल्पना, डॉक्टर मुलगा मोहित, सून प्रिती आणि नातवंडासोबत राहतात. त्यांचे बोरिवलीतील शांतीवन कॉम्प्लेक्सच्या कोयना सहकारी सोसायटीमध्ये स्वतचे मोहित नावाचे एक हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये भाईंदरचा रहिवाशी असलेला विकास जैन याचा न्यू नॅशनल मेडीको नावाचे एक मेडीकल शॉप आहे. हॉस्पिटलच्या बाजूला मेडीकल शॉप असल्याने अरुणकुमार जैन आणि विकास जैन हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या परिचित होते. त्यांच्यात चांगले व्यावसायिक संबंध निर्माण झाले होते. अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत होते. एप्रिल २०२४ रोजी विकास हा त्यांना भेटण्यासाठी आला होता. यावेळी त्याने त्यांना आकर्षक गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. त्याच्या संपर्कातील मुंबईतील विविध डायग्नोस्टिक सेंटर आणि पॅथोलॉजी लॅब आहे. त्यात रक्त तपासणी आणि इतर कामासाठी लागणारे अत्याधुनिक मशिन बसविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी त्यांनी तीस लाखांची गुंतवणुक केल्यास त्यांना चार महिने प्रति महिना साडेसात लाख, पुढे सहा महिने प्रति महिना पाच लाख ऐंशी हजार, त्यानंतर २६ महिने प्रति महिना ५० हजार रुपये परवाता मिळेल. त्यामुळे त्यांनी त्याच्या योजनेत गुंतवणुक करावी असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात चांगले संबंध होते, त्यामुळे त्याच्यावर विश्‍वास ठेवून डॉ. अरुणकुमार जैन यांनी त्यांच्यासह त्यांच्या मुलाच्या नावाने विकास जैनच्या सांगण्यावरुन विविध योजनेत सुमारे ५० लाखांची गुंतवणुक केली होती. याबाबत त्यांच्यात एमओयू बनविण्यात आले होते.

या गुंतवणुकीवर त्यांना मे महिन्यांत साडेसात लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. मात्र नंतर त्याच्याकडून परताव्याची रक्कम बंद झाली होती. त्यामुळे त्यांनी विकासला फोन करुन विचारणा केली. यावेळी त्याने विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. १५ जूनला तो मेडीकल शॉपवर दिसला होता, मात्र नंतर तो मेडीकल शॉप बंद करुन पळून गेला होता. चौकशीअंती डॉ. अरुणकुमार जैन यांना विकासने त्यांच्यासह मुजीत पटेल, विजय कोळेकर व इतर लोकांना अशाच प्रकारे विविध आकर्षक आकर्षक योजनेची माहिती सांगून त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून तयंच्याकडून लाखो रुपये घेतले होते, या रक्कमेचा अपहार करुन तो पळून गेला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी विकास जैनविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page