पाच हजारात विकत घेतलेल्या बाळाची ४० हजारामध्ये विक्री
बाळाच्या खरेदी-विक्रीप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल भोईवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल तर तपास रायगड पोलिसांकडे
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – पाच हजारामध्ये विकत घेतलेल्या एक वर्षांच्या बाळाची ४० हजारामध्ये खरेदी-विक्रीचा झाल्याचा धक्कादायक प्रकार परळ परिसरात उघडकीस आला आहे. बाळाच्या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी आठजणांच्या टोळीविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास रायगड पोलिसाकडे सोपविला आहे. चंद्रकांत वाघमारे, शेवंती वाघमारे, परशुराम लक्ष्मण चौगले, मालती परशुराम चौगले, लक्ष्मी भालचंद्र पाटील, दिप्ती पावसे, भास्कर चौलकर आणि तुकाराम रामा पाटील अशी या आठजणांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच यातील काही आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली असून या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहै. आजारी असलेल्या या बाळाला परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यांनतर त्याच्याावर उपचार करणार्या डॉक्टरांच्या सतर्कमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.
नरेंद्र बळीराम पाटील हे फोर्ट येथील एमआरए मार्ग पोलीस वसाहतीत राहत असून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या भोईवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता ते दिवसपाळीवर कर्तव्यावर होते. यावेळी वाडिया हॉस्पिटलच्या डॉ. शहा इरा आणि विशाल जहा यांनी पोलिसांना एक अहवाल पाठविला होता. त्यात एक व्यक्ती साई नावाच्या एका एक वर्षांच्या मुलाला घेऊन औषधोपचारासाठी वाडिया हॉस्पिटमध्ये आले होते. त्यांच्याकडे असलेले बाळ दत्तक घेण्यात आले असून त्यांच्याकडे बाळाचे दत्तक घेतल्याचे कुठलेही कागदपत्रे नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर या बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेल्या परशुराम चौगुले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत परशुराम हा रायगडचया श्रीवर्धनचा रहिवाशी असून तो तिथे त्याची पत्नी मालतीसोबत राहतो. तो मच्छिमारी करत असून त्याने साई हा त्याचा मुलगा असल्याचे सांगितले होते. तो आजारी असल्याने त्याने साईला १४ फेब्रुवारीला मानगावच्या डॉ. यादव यांच्याकडे नेले होते. त्याने त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केले आणि त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत नेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते साईला घेऊन परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आले होते. औषधोपचारादरम्यान त्याने डॉक्टरांना त्याने दत्तक घेतल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्याकडे डॉक्टरांनी दत्तक घेतल्याच्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र त्याच्याकडे काहीच कागदपत्रे नव्हते.
याच चौकशीदरम्यान परशुरामने त्याच्या लग्नाला तीस वर्ष झाले होते. मात्र त्यांना मूळबाळ होत नव्हते. त्यामुळे त्याला त्याच्याच गावात राहणारी त्याची बहिण लक्ष्मी पाटील हिने त्यांच्या शेजारील वडवली गावात राहणारे चंद्रकांत वाघमारे यांना दिप्ती पावसे हिने एक मूल दिले आहे. ते मूल तिला नको असल्याने ते मूल तुम्ही घ्या असा सल्ला दिला होता. त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी ते मूल घेण्याचा विचार केला. त्यामुळे परशुराम, त्याची पत्नी मालती आणि बहिण लक्ष्मी हे तिघेही दिप्तीच्या घरी गेले होते. यावेळी दिप्तीने ते मूल तिने चंद्रकांत वाघ याच्याकडून पाच हजारामध्ये विकत घेतले आहे. ते मूल तिच्याकडे राहत नाही. सतत रडत असल्याने ते मूल तिला आता नको आहे. त्यामुळे त्यांनी ते मूल घेण्याची तयारी दर्शविली होती. ही माहिती त्यांनी त्यांच्या गावचे सरपंच भास्कर चौलकर आणि त्यांचा मेहुणा तुकाराम पाटील यांना दिली.
३० सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्यात एक मिटींग झाली आणि या मिटींगमध्ये ते मूल देण्यासाठी दिप्तीने त्यांच्याकडे ४० हजाराची मागणी केली होती. त्यामुळे परशुरामने तिला ५ हजार रुपये दिले होते. उर्वरित ३५ हजार जून २०२४ रोजी देण्याचे ठरले होते. त्यानंतर दिप्तीने मुलाचा ताबा परशुराम व त्यांची पत्नी मालतीकडे सोपविला होता. घरी आणलेल्या या मुलाचे नाव त्यांनी साई ठेवले होते. गेल्या आठवड्यात साई अचानक आजारी पडल्याने त्याला घेऊन परशुराम हे वाडिया हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी परशुरामकडे बाळाची चौकशी केल्यानंतर बाळ खरेदी-विक्रीचा हा प्रकार उघडकीस आला होता.
तपासात आलेल्या या माहितीनंतर भोईवाडा पोलिसांनी चंद्रकांत वाघमारे, शेवंती वाघमारे, परशुराम लक्ष्मण चौगले, मालती परशुराम चौगले, लक्ष्मी भालचंद्र पाटील, दिप्ती पावसे, भास्कर चौलकर आणि तुकाराम पाटील यांच्याविरुद्ध भादवीच्या ३३६, ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा त्यांच्या गावी घडल्याने त्याचा तपास रायगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्यांचे कागदपत्रे रायगड पोलिसांकडे सोपविण्यात आले असून या गुन्ह्यांचा रायगड पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून बाळाच्या खरेदी-विक्रीचे एक रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.