मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – झव्हेरी बाजार येथे एका इमिटेशन ज्वेलरी दुकानात घरफोडीची घटना घडली. पत्नीच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवलेली सुमारे साडेअकरा लाखांची कॅश चोरट्याने पळवून नेली. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
ही घटना बुधवारी २४ जुलै रात्री साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान झव्हेरी बाजार येथील चंपागल्ली, क्षत्र बॅन्गल्स दुकानात घडली. लालबाग येथे राहणार्या अशोककुमार पुखराज जैन यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. झव्हेरी बाजार येथे त्यांच्या मालकीचे इमिटेशन ज्वेलरीचे एक दुकान असून तिथे पाच पुरुष आणि तीन महिला कामाला आहेत. होलसेलमध्ये दागिन्यांची विक्री करत असल्याने त्यांचा बहुतांश व्यवहार कॅश स्वरुपात चालतो. २७ जुलैला त्यांच्या पत्नीचा गुडघ्याचा ऑपरेशन होते, त्यासाठी त्यांनी साडेअकरा लाख रुपये जमा करुन त्यांच्या दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवले होते. बुधवारी २४ जुलैला दिवसभराचे काम संपल्यानंतर ते दुकानाला टाळे लावून निघून गेले होते. दुसर्या दिवशी त्यांचा मुलगा अमन हा दुकानात आला होता. यावेळी त्याला दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यामुळे त्याने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते, पत्नीच्या ऑपरेशनसाठी ड्राव्हरमध्ये ठेवलेली सुमारे साडेअकरा लाख रुपयांची कॅश चोरट्याने पळविली होती. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने त्याच्या वडिलांसह एल. टी मार्ग पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अशोककुमार जैन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.