सात फ्लॅटसाठी घेतलेल्या ३७ लाखांचा अपहार करुन फसवणुक
फसवणुकीप्रकरणी सिद्धीटेक होम्स कंपनीच्या संचालकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – बदलापूर येथील खरवई रोडवर सुर असलेल्या सिद्धी सिटी फेज चारच्या गोपाल लँड इमारतीमध्ये सात फ्लॅटसाठी दिलेल्या सुमारे ३७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सिद्धीटेक होम्स कंपनीचे संचालक हेमंत मोहन अग्रवाल याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत कंपनीची संचालिका नेहा हेमंत अग्रवाल आणि डीएचएफएल प्रॉपटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. के माथुर सहआरोपी असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
करणवीरसिंग सचदेव हे हॉटेल व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथे राहतात. त्यांच्या मालकीचे वांद्रे येथे दोन नामांकित हॉटेल आहेत. त्यांच्या परिचित कन्हैयलाल विधानी हे इस्टेट एजंट असून त्यांनी त्यांना हेमंत अग्रवाल यांच्या बदलापूर येथील सिद्धीसिटी कॉम्प्लेक्सची माहिती माहिती दिली होती. गुंतवणुक म्हणून त्यांनी तिथे फ्लॅट खरेदी करण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी गुंतवणुक करुन सिद्धीसिटी कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच संदर्भात त्यांनी कंपनीेचे मालक आणि संचालक हेमंत अग्रवाल, नेहा अग्रवाल आणि बी. के माथुर यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत फ्लॅटबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी तिथे सात फ्लॅट बुक केले होते. सप्टेंबर २०११ ते एप्रिल २०४ या कालावधीत त्यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात सुमारे ३७ लाख रुपयांचे पेमेंट ट्रान्स्फर केले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या तिघांनी त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटची जास्त किंमतीत इतरांना परस्पर विक्री केली होती.
हा प्रकार नंतर त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिन्ही आरोपीकडे फ्लॅटची तसेच फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी फ्लॅट दिले नाही किंवा पैसेही परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध बीकेसी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हेमंत अग्रवाल, नेहा अग्रवाल आणि बी. के माथुर यांच्याविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच हेमंत अग्रवालला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.