बोगस बॅक खाते उघडण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस अटक

झारखंडची टोळी असल्याची शक्यता; इतर सहकार्‍यांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जुलै २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका खाजगी बँकेत बोगस बँक खाते उघडण्याचा प्रयत्न बँकेच्या अधिकार्‍यांच्या सतर्कमुळे फसला गेला. या बँक अधिकार्‍यांच्या मदतीने वर्सोवा पोलिसांनी बोगस बँक खाते उघडणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पियुषराज राजकुमार दांगी या २४ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा झारखंडच्या हजारीबागचा रहिवाशी आहे. फसवणुकीसाठी सायबर ठगांसाठी ही टोळी विविध बँकेत बोगस दस्तावेज सादर करुन बँक खाते उघडत असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. ही झारखंडची टोळी असून अटक आरेपींच्या इतर आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यातील तक्रारदार महिला अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरातील एका खाजगी बँकेचे मॅनेजर म्हणून काम करते. १२ जुलैला त्यांच्या बँकेत पियुराज दांगी, विरेंदर दांगी आणि उदय दांगी नावाचे तीन तरुण आले होते. या तिघांनी नवीन बँक खाते उघडण्यासाठी स्वतचे फोटो वापरुन काही कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर बँक अधिकार्‍यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे विविध बँक खात्यात बचत खाते उघडण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच या बँक मॅनेजर महिलेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध ३१९ (२), ३३८, ३४० (२), ३३६ (३) भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. सोमवारी याच बँकेत पियुराज हा आला होता. ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाने पियुषराजला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत तो मूळचा झारखंडचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्याचे दोन्ही सहकारी विरेंदर दांगी आणि उदय दांगी हे त्याचे नातेवाईक असून या तिघांनी बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या मदतीने विविध बँकेत खाते उघडले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अर्जासोबत वेगवेगळे मोबाईल क्रमांक आणि राहण्याचे बोगस पत्ते देऊन बँकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या तपासात बोगस बँक खाते उघडणारी झारखंडची ही टोळी असून या टोळीतील आरोपी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बोगस बँक खाते उघडण्यास मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या बोगस बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांनी विविध नावांनी पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनविले होते. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी काही सिमकार्ड घेतले होते.

पोलीस कोठडीत असलेल्या पियुषराजची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड कोठून बनविले, या बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांनी आतापर्यंत किती बँक खात्यात बँक खाते उघडले आहेत. त्याचे इतर दोन सहकारी सध्या कुठे आहेत, या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. पियुषराजच्या अटकेने झारखंडच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पियुराज दांगी या आरोपीस अटक केल्याचे सांगितले, मात्र तपास सुरु असल्याने अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page