वैष्णवदेवीच्या कॉईनच्या नावाने वयोवृद्धाची फसवणुक
साडेआठ लाखांना गंडा घालणार्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – वैष्णवदेवीचे चित्र असलेला पाच रुपयांच्या कॉईनवर नऊ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून कॉईनसाठी विविध कागदपत्रांसाठी सुमारे साडेआठ लाख रुपये पाठविण्यास प्रवृत्त करुन एका वयोवृद्धाची फसवणुक झाल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. नऊ लाखांच्या आशेने या वयोवृद्धाने विश्वासात विविध बँक खात्यात पाठविलेल्या साडेआठ लाखांचा अज्ञात व्यक्तीने अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
७८ वर्षांचे सिल्वेरा हार्बट मॅथ्यू बॉस्को हे त्यांच्या ७१ वर्षांच्या वयोवृद्ध बहिणीसोबत माहीमच्या मोरी रोड, पुष्पा कुंज अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना जुने कॉईन जमा करण्याचा छंद आहे. २६ जूनला ते फेसबुकवर पाहत असताना त्यांना संजीवकुमार नावाच्या एका व्यक्तीचा जाहिरात व्हिडीओ दिसला. त्यात वैष्णवदेवीचे चित्र असलेला एक पाच रुपयांचा कॉईन होते. ते कॉईन ज्या व्यक्तीकडे असेल त्याला नऊ लाख रुपये मिळतील असे लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी संजीवकुमारला मोबाईल संपर्क साधला होता. यावेळी त्याने त्यांना ते कॉईन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ते कॉईनच्या मोबदल्यात त्यांना नऊ लाख रुपये मिळतील असे सांगितले. काही दिवसांनी त्याने त्यांचा आधारकार्ड आणि फोटो घेतला होता. त्यानंतर त्यांना जीएसटीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून लेटर ऑफ ट्रान्समिशन, सेल्स टॅक्स, रिटर्न टू रिपोर्ट, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, जीपीएस, अरेस्ट वॉरंट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, टीडीएस असे विविध कागदपत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
या सर्व कागदपत्रांसाठीही त्यांना काही रक्कम पाठविण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला ८ लाख ५८ हजार ४९२ रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठवूनही त्याने त्यांना वैष्णवदेवीचे चित्र असलेले पाच रुपयांचे कॉईन पाठविले नाही. नऊ लाखांचे खोटे आश्वासन देऊन त्याने त्यांना साडेआठ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच या वयोवृद्धाने घडलेला प्रकार माहीम पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.