म्हाडा फ्लॅटसाठी दोन वयोवृद्धांची १.३२ कोटीची फसवणुक
दादर येथील घटना; महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – बाजारभावापेक्षा कमी किंमतीत म्हाडा फ्लॅट देतो असे सांगून दोन वयोवृद्धांची १ कोटी ३२ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध दादर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बेला मेल्विन डिसोझा, मेल्विन डिसोझा आणि जितेंद्र राठोड अशी या तिघांची नावे आहेत. लवकरच या तिघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लेसली जॉन हेक्टर लोबो हे ८८ वर्षांचे वयोवृद्ध दादर परिसरात राहत असून ते एका खाजगी बँकेतनू निवृत्त झाले आहेत. सात वर्षापूर्ंवी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना म्हाडा फ्लॅटची एक फाईल आहे. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत हा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या बतावणीला भुलून त्यांनी त्यांना म्हाडा फ्लॅटसाठी १ कोटी १७ लाख ४९ हजार रुपये दिले होते. ही माहिती त्यांचा मित्र फ्रॉन्सिस मिगेल लोबो याला समजताच त्यानेही त्यांच्याकडे म्हाडा फ्लॅट मिळवून देण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी फ्लॅटसाठी साडेपंधरा लाख रुपये घेतले होते. अशा प्रकारे बेला डिसोझा, मेल्विन डिसोझा आणि जितेंद्र राठोड यांनी त्यांच्याकडून फ्लॅटसाठी १ कोटी ३२ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर या दोघांनी तिन्ही आरोपींनी म्हाडा फ्लॅटचे बोगस दस्तावेज दिले होते. वारंवार विचारणा करुनही फ्लॅटचा ताबा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. यावेळी तिथे असलेल्या अधिकार्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व दस्तावेज बोगस आहेत. त्यांच्या नावाने म्हाडाचा कुठलाही फ्लॅट अलोट झालेला नाही. संबंधित तिन्ही आरोपींकडून त्यांची फसवणुक झाल्याचे सांगितले. डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी या तिघांकडून पैशांची मागणी सुरु केली होती.
गेल्या दिड वर्षांपासून ते तिघेही पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. या तिघांकडून पैसे मिळण्याची कुठलीही शाश्वती नसल्याने लेसली लोबो यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बेला डिसोझा, मेल्विन डिसोझा आणि जितेंद्र राठोड यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या तिघांची पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.