मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुंबई शहरात सुरु असलेल्या दोन सेक्स रॅकेटचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीसह चार तरुणींची सुटका केली आहे. या सर्वांना बाल तसेच महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी बांगुरनगर आणि शिवाजीनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांत शबनम नावाच एका ३० वर्षांच्या महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली तर सलमा अल्ताफ सलमानी या पळून गेलेल्या महिलेचा बांगुरनगर पोलीस शोध घेत आहेत.
शबनम ही गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत असून ती काही अल्पवयीन मुलींना पैशांचा आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी शबनमला तिच्या राहत्या घरातून अटक केली. चौकशीदरम्यान तिने दोन अल्पवयीन मुलींना दोन पुरुषासोबत शारीरिक संबंधासाठी पाठविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सतरा आणि तेरा वर्षांच्या या दोन्ही मुलींची पोलिसांनी सुटका केली. सतरा वर्षांच्या मुलीच्या चौकशीतून शबनम ही सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. तिने तिच्यासह तेरा वर्षांच्या मुलीला दोन पुरुषासोबत पाठविले होते. त्यांच्याकडून मिळालेली अर्धी रक्कम त्यांना दिली तर उर्वरित रक्कम तिने स्वतकडे ठेवून घेतली होती. या मुलीच्या तक्रारीवरुन शबनमसह इतर आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शबनमला पोलिसांनी अटक केली. तिला यापूर्वी अशाच एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने पुन्हा हा धंदा सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सुटका केलेल्या दोन्ही मुलींना देवनारच्या वसतीगृहात पाठविण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत अंमलबजावणी विभागाने गोरेगाव येथून एका हॉटेलमधून चार तरुणींची सुटका केली. सलमा सलमानी नावाची महिला काही महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवून तिच्या संपर्कात असलेल्या तरुणींना ग्राहकांसोबत विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सलमाला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. आर्थिक व्यवहाराची बोलणी झाल्यानंतर तिने चार तरुणींना गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये पाठविले होते. मात्र ती त्यांच्यासोबत आली नव्हती. यावेळी पोलिसांनी गोरेगाव येथील लिंक रोड, बांगुरनगर मेट्रो स्टेशनजवळील ग्लोबल स्पेसेसच्या रुम क्रमांक ३०३ मधून आलेल्या चारही तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांना सलमाने पाठविल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर सलमाविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या सलमाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.