मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ज्वेलर्स दुकानात दोन महिलांसह तिघांनी लुटमारीचा प्रयत्न केल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शबाना तबरेज शेख या महिलेस डोंगरी पोलिसांनी अटक केली तर तिचे सहकारी असलेले शनिला बँगवाला आणि अब्दुल्ला बॅगवाला हे दोघेही पळून गेले. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
किशोरकुमार बाबूलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते डोंगरी परिसरात राहतात. याच परिसरातील मेमनवाडा रोडवर त्यांच्या मालकीचे आर जे ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. बुधवारी ३१ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या दुकानात दोन महिलांसह तिघेजण दागिने खरेदीसाठी आले होते. या तिघांना दागिने दाखवत असताना एका महिलेने त्यांच्या डोळ्यात मिरचीची स्प्रे मारला. त्यानंतर ते दुकानातील सोन्याची चैन आणि कर्णफुले असा ७२ हजाराचे दागिने घेऊन पळून गेले. हा प्रकार किशोरकुमार जैन यांच्याकडून समजताच पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध लुटमारीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
दुकानासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी काही तासांत शबाना शेख या महिलेस अटक केली. चौकशीत तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. तिच्याकडून चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. तिच्या चौकशीतून पळून गेलेल्या आरोपीचे नाव शनिला बॅगवाला आणि अब्दुल्ला बॅगवाला असल्याचे उघडकीस आले. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर शबानाला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी कुर्ल्याचे रहिवाशी असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहे.