मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – एसआरए फ्लॅटच्या आमिषाने एका महिलेसह तिघांची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुरगन मायकल देवेंद्र आणि नासीर मोहम्मद युसूफ शेख अशी या दोघांची नावे आहेत. फ्लॅटसाठी घेतलेल्या ५१ लाख ५० हजाराचा अपहार करुन तिघांची फसवणुक केल्याचा या दोघांवर आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.
प्रकाश आयपिल्ले हे कांदिवलीतील गणेशनगर ब्रह्मगिरी सोसायटीमध्ये राहत असून त्यांचा स्वतचा प्रकाश जनरल स्टोर नावाचे एक दुकान आहे. २०११ साली याच परिसरात राहणार्या मुरगन देवेंद्रने त्यांना तो कांदिवलीतील भाबरेकरनगर, चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट, परिश्रम सोसायटीचा अध्यक्ष असून तिथे एसआरए इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. लकडावाला डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एसआरए इमारतीचे कंत्राट मिळाले असून कंपनीचा मॅनेजर नासीर शेख हा त्यांचा मित्र आहे. तीन वर्षांत स्थानिक रहिवाशांना नवीन इमारतीमध्ये फ्लॅट मिळणार आहे. या एसआरए इमारतीमध्ये त्यांना नासीरच्या मदतीने स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तिथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. याच फ्लॅटसाठ त्यांनी मुरगन आणि नासीरला पंधरा लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांना लकडावाला कंपनीच्या लेटरहेडवर त्यांचे नाव आणि फोटो असलेला रुम अलोट झाल्याचे लेटर देण्यात आले होते.
मात्र सात वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच प्रकाश आयपिल्ले यांनी या दोघांविषयी चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान या दोघांनी लकडावाला डेव्हलपर्स कंपनीच्या बोगस कागदपत्रे बनवून अनेकांना एसआरएचे फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. फसवणुक झालेल्या लोकांनी त्यांच्याविरुद्ध चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केली हातेी. त्यापैकी एडवर्ड नवामनी यांच्याकडून साडेतेरा लाख तर लता काशी चेट्टीयार या महिलेकडून तेवीस लाख रुपये मुरगन आणि नासीर यांनी घेतले होते. अशाच प्रकारे या दोघांनी या तिघांनाही एसआरए फ्लॅटच्या नावाने ५१ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला होता. त्यामुळे त्यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर मुरगन देवेंद्र आणि नासीर शेख या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या दोघांनी आतापर्यंत तिघांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असले तरी त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीच्या रक्कमेचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एसआरए फ्लॅटच्या नावाने मुरगन आणि नासीरकडून फसवणुक झालेल्या लोकांनी चारकोप पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.