वयोवृद्धाचा अज्ञानाचा फायदा घेऊन ९६ लाखांचा अपहार
फसवणुकीप्रकरणी तक्रारदाराच्या भाच्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुलाविषयी गैरसमज निर्माण करुन आयकर आणि पोलिसांची भीती दाखवून वयोवृद्ध नातेवाईकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सुमारे ९६ लाखांची प्रॉपटी हडप केल्याप्रकरणी जेकब देवराज मदारी या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. जेकब तक्रारदार वयोवृद्धाचा भाचा असून याच गुन्ह्यांत त्याची पत्नी पद्मा जेकब मदारी ही सहआरोपी आहे. या दोघांनीही ही प्रॉपटी हडप करुन त्यांच्याच नातेवाईकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर जेकबला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरी येथे येशुरत्नम जकरण्णा जंगम (७५) हे त्यांचा मुलगा जोशवा यांच्यासोबत राहतात. त्यांचे मुंबईसह हैद्राबाद येथे काही प्रॉपटी आहेत. त्यांच्या पत्नीचे कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांना मूळबाळ नसल्याने २८ वर्षांपूर्वी त्यांनी जोशवा याला पार्ले मिशनरी चॅरिटीमधून कायदेशीर प्रक्रिया करुन दत्तक घेतले होते. पत्नीच्या निधनानंतर त्यांचे त्यांच्या मुलासोबत क्षुल्लक कारणावरुन वाद होत असल्याने ते त्यांच्या सायन येथे राहणार्या बहिणीकडे राहण्यासाठी गेले होते. बहिणीचा मुलगा जेकब आणि त्याची पत्नी पद्मा हे दोघेही त्यांचा सांभाळ करत होते. त्यांच्या चांगुलपणासह अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्या मुलाविषयी त्यांना भडकाविण्यास सुरुवात केली होती. जोशवा त्यांचा सांभाळ करणार नाही. तुम्हाला मारुन टाकेल, तुमची संपत्ती हडप करेल अशी भीती घालत होते. या दोघांनी त्यांच्या प्रॉपटीसह बँकेचे सर्व महत्त्वाचे दस्तावेज कपाटात सुरक्षित ठेवतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या प्रॉपटीसह इतर महत्त्वाचे दस्तावेज स्वतकडे ठेवले होते. तसेच मरेपर्यंत ते दोघेही त्यांचा सांभाळ करतील असे आश्वासन दिले होते. त्यांच्या अज्ञानाचा तसेच चांगुलपणाचा फायदा घेऊन त्यांच्या बँकेत जास्त पैसे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयकर विभागासह पोलिसांची कारवाईसह त्यांचे बँकेतील कॅश जप्त होऊ शकते अशी भीती घातली होती. त्यानंतर जेकब त्यांना बँकेत घेऊन गेला आणि तिथे वेगवेगळ्या कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी घेतली होती.
अशा प्रकारे त्याने त्यांच्या बँक खात्यातील सर्व कॅश, ठेवी, १२ तोळे सोने आणि ४० किलो चांदी आदी स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले होते. त्यांच्या मालवणीसह हैद्राबादची प्रॉपटी विकून त्यातून आलेली सुमारे ३५ लाख रुपये त्याने स्वतकडे ठेवून घेतले होते. त्याने त्याच्या नावाने पॉवर ऑफ ऍटनी बनवून त्यांची प्रॉपटी हडप करण्याचा प्रयत्न केला होता. याकामी त्याला त्याची पत्नी पद्मा मदारीने मदत केली होती. याच दरम्यान त्यांचा मुलगा जोशवा हा आजारी असल्याचे समजताच ते अंधेरीतील फ्लॅटमध्ये जाण्यासाठी निघाले होते. मात्र या दोघांनी त्यांना तिथे जाऊ दिले नाही. त्यांना दम देऊन घरातच कोंडून ठेवले होते. मात्र संधी मिळताच ते शीव येथून अंधेरीतील राहत्या घरी आले. त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांनी तिन्ही बँकेत जाऊन चौकशी केली असता जेकब आणि पद्मा यांनी त्यांच्या बँकेचे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे दिसून आले. अशा प्रकारे या दोघांनी त्यांच्या सुमारे ९६ लाखांची प्रॉपटी हडप करुन त्यांच्या पैशांचा अपहार केला होता.
हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जेकब आणि पद्माविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या जेकब मदारीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने येशुत्नम जंगम यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहै. या गुन्ह्यांत त्याची पत्नी पद्मा हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.