मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – डॉक्टर पत्नीची हत्या करुन पतीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. मृतांमध्ये किशोर पेडणेकर आणि डॉ. राजश्री किशोर पेडणेकर यांचा समावेश आहे. या घटनेमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र कौटुंबिक कारणावरुन किशोर यांनीच त्यांच्याच पत्नीची हत्या करुन नंतर आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक मधूसुदन नाईक यांनी सांगितले. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्या आणि आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
ही घटना गोरेगाव येथील जवाहरनगर, ललित बारजवळील टोपीवाला मेंशन अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३२ मध्ये किशोर पेडणेकर हे त्यांची डॉक्टर पत्नी राजश्रीसोबत राहत होते. त्यांना एक मुलगा असून तो दिल्लीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. किशोर हे दहिसर येथील एका जिम उपकरण पुरविण्याच्या कंपनीत तर त्यांची पत्नी राजश्री ही मालाड येथे फिजिओथेरेपी क्लिनिक चालवत होती. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता टोपीवाला मेन्शन अपार्टमेंटच्या आवारात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सुरक्षारक्षकाला दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी गोरेगाव पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. स्थानिक रहिवाशांकडून त्यांचे नाव किशोर पेडणेकर असल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या पत्नीला फोन केला, मात्र तिने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांच्या बहिणीसह इतर नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली होती. ते सर्वजण ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली होती.
या चौकशीदरम्यान किशोर हे काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. त्यांच्या गळ्यात पोलिसांना त्यांच्या फ्लॅटची चावी सापडली. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी नातेवाईकासोबत फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांना राजश्री पेडणेकर या बेशुद्धावस्थेत दिसून आल्या. त्यामुळे तिला पोलिसांनी ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. किशोर यांनी त्यांच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यापूर्वी त्यांनी विष प्राशन केले होते. टेरेसवरुन उडी मारल्यानंतर ते सोसायटीच्या एका झाडावर पडले, मात्र त्यांचे वजन जास्त असल्याने ती फांदी तुटली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आत्महत्येपूर्वी किशोर यांनी त्यांच्या नातेवाईकांना मॅसेज पाठविला असून त्यात त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली आहे. तसेच आपण जीवन संपवत असल्याचे नमूद केले होते.
किशोर आणि राजश्री लवकरच त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी दिल्लीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी विमानाचे तिकिट काढले होते. त्यांच्या घरातून पोलिसांनी विमानाचे तिकिट ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील अधिकृत कारण समजू शकले नाही किंवा किशोर यांच्याकडे कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. मात्र मानसिक नैराश्यातून त्यांनी पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक मधूसुदन नाईक यांनी सांगितले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.