कात्पायनी ज्वेलर्स गोळीबारासह दरोड्यातील मुख्य सूत्रधाराला अटक
गुन्हे शाखेची कारवाई; चोरीच्या दागिन्यासह पिस्तूल व काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
कोल्हापूर, – गेल्या वर्षी जून महिन्यांत कोल्हापूर येथील बालिंगा परिसरात झालेल्या कात्पायनी ज्वेलर्स दुकानात गोळीबारासह दरोड्यातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस मध्यप्रदेशातून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. भूपेंद्र ऊर्फ भुपेश ऊर्फ राणा ऊर्फ गजराजसिंग यादव ऊर्फ पवन शर्मा यादव असे या आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील मुरेना रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या दिडशे ग्रॅम वजनाच्या दागिन्यांसह एक देशी बनावटीचे पिस्तूल, चार राऊंड जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला भूपेंद्र हा पाचवा असून तोच या कटातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सांगितले.
रमेश शंकरजी माळी हे ज्चेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे बालिंगा परिसरात कात्पायनी ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. ८ जून २०२३ रोजी ते त्यांचा मेहुणा जितेंद्र मोडाजी माळी याच्यासोबत दुकानात बसले होते. यावेळी चार ते पाचजणांच्या एका टोळीने त्यांच्या दुकानासह दुकानाबाहेर अंधाधूंद गोळीबार करुन दुकानातील १ कोटी ८७ लाख १२ हजार ४९२ रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि दिड लाख रुपयांची कॅश असा मुद्देमाल चोरी करुन बाईकवरुन पलायन केले होते. याप्रकरणी रमेश माळी यांच्या तक्रारीवरुन करवीर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भादवीसह घातक शस्त्रे कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारासह दरोड्याच्या घटनेने परिसरातील व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवून आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी सतीश ऊर्फसंदीप सखाराम पोहाळकर, अंबाजी शिवाजी सुळेकर आणि विशाल धनाजी वरेकर या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून दरोड्यातील सुमारे २३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले होते. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या इंदौर येथून अंकित ऊर्फ छोटू श्रीनिवास शर्मा या अन्य एका आरोपीस अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी एक हंडाई कार, चार महागडे मोबाईल, एक वायफाय डोंगल, एक की पॅड मोबाईल, दोन सिमकार्ड, दिडशे ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन देशी बनावटीचे पिस्तूल, सात राऊंड असा सोळा लाख पंधरा हजार रुपयांचा हस्तगत केला होता.
याच गुन्ह्यांत मध्यप्रदेशातील तीन आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांची माहिती काढताना या कटातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र हा इंदोर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुंभार, अमीत मर्दांने, विनोद कांबळे, विलास किरोळकर, राजेंद्र बरंडेकर, सागर चौगले आदीचे एक पथक मध्यप्रदेशात गेले होते. या पथकाने तांत्रिक माहितीसह मिळालेल्या माहितीवरुन या कटाचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र याला शिताफीने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या दागिन्यांसह गुन्ह्यांतील पिस्तूल, राऊंड जप्त केले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कोल्हापूर येथे आणण्यात आले होते. चौकशीत त्यानेच या संपूर्ण कटाची आखणी केली होती. दरोड्यानंतर तो कोल्हापूर येथून मध्यप्रदेशात पळून गेला होता. तेव्हापासून तो विविध परिसरात लपून राहत होता. अखेर आठ महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह त्यांच्या पथकाला यश आले आहे.