मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन घराची झडती घेण्याचा बहाणा करुन एका अज्ञात व्यक्तीने सुमारे वीस लाखांची कॅश पळवून नेल्याची घटना प्रभादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
ही घटना रविवारी पहाटे पावणेचार ते पावणेपाचच्या सुमारास प्रभादेवी येथील हातिस्कर मार्ग, सत्यविजय सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक दोनमध्ये करण पदम बालाया (२८) हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी पहाटे पावणेचार वाजता त्याचा घरी एक अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. त्याने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याची बतावणी करुन घरातील सर्व लाईट चालू करण्यास सांगितले. त्याच्याकडे वॉरंट असून त्याला घराची झडती घ्यायची आहे. ही पोलीस कारवाई असल्याने त्यात कोणीही हस्तक्षेप करु नका, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करु अशी धमकी दिली. सर्व सामानाची तपासणी केल्यानंतर त्याला त्याचे मालक राजन शंकर जाधव यांच्या मालकीचे वीस लाख रुपये मिळाले. ही कॅश ताब्यात घेऊन तो घरातून निघून गेला. हा प्रकार संशयास्पद वाटताच करण बालाया हा त्याच्या मागे जाऊ लागला. यावेळी त्याने त्याला शिवीागळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. हा प्रकार संशयास्द वाटताच त्याने ही माहिती राजन जाधव यांच्यासह दादर पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घडलेला प्रकार पोलिसांना सांगून त्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध २०४, ३१८ (४), ३१९ (२), ३३२, ३५१ (२), ३५२ भादवी न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी करणला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आरोपीची जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.