गटारी पार्टीत ३० वर्षांच्या तरुणाची मित्रांकडून हत्या
कोकणात जाणार्या ट्रेनमधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – गटारीच्या पार्टीसाठी मित्राकडे आलेल्या अर्शदअली सादिकअली शेख या ३० वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर मित्राचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून ती सुटकेत कोकणात जाणार्या ट्रेनमध्ये नेताना एका आरोपीला सतर्क रेल्वे पोलिसांनी पकडून या गुन्ह्यांचा अवघ्या चार तासांत पर्दाफाश केला. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत दोन्ही मारेकरी आरोपी मित्रांना अटक केली आहे. शिवजीत सुरेंद्र सिंग आणि जय प्रविण चावडा अशी या दोघांची नावे असून या दोघांना मंगळवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अर्शदअली हा सांताक्रुज येथील कालिना परिसरातील रहिवाशी असून शिवजीत आणि जय हे दोघेही त्याचे मित्र आहेत. रविवारी गटारी असल्याने त्यांनी पायधुनी येथे गटारीची पार्टी ठेवली होती. त्यामुळे अर्शदअली पायधुनी येथे मित्राकडे आला होता. मद्यप्राशन करताना अर्शदअली आणि शिवजीत यांच्यात त्यांच्या मैत्रिणीवरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात शिवजीतने अर्शदअलीच्या डोक्यात तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर शिवजीत आणि जय हे दोघेही प्रचंड घाबरले. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह एका पिशवीत गुंडाळून नंतर ट्रॉली बॅगेत भरला होता. काही वेळानंतर शिवजीत हा उल्हासनगरला पळून गेला तर जय हा मृतदेह असलेली टॉली बॅग घेऊन दादर रेल्वे स्थानकात आला. फलाट क्रमांक अकरामधून बॅग घेऊन जाताना त्याला रेल्वे सुरक्षा बलाचा पोलीस हवालदार संतोषकुमार रामराज यादवला थांबविले. त्याच्याकडे बॅगेबाबत चौकशी केली असता तो प्रचंड गोंधळून गेला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने बॅग उघडून पाहिली असता त्यात अर्शदअलीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह होता. ही बॅग जय हा कोकणात जाणार्या ट्रेनमधून ठेवून जाणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याला सतर्क रेल्वे कर्मचार्याने ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच दादर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार केल्याचे दिसून आले. हत्येचा प्रकार उघडकीस येताच मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. चौकशीदरम्यान ही हत्या पायधुनी परिसरात झाल्याने त्याचा तपास पायधुनी पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.
या गुन्ह्यांत जयसोबत शिवजीतचा सहभाग उघडकीस आला होता, मात्र हत्येनंतर शिवजीत हा पळून गेला होता. त्यामुळे त्याला पायधुनी पोलिसांच्या एका विशेष पथकाने उल्हासनगर येथून काही तासांत अटक केली. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. मात्र गटारीच्या पार्टीत मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध १०३ (१), २३८ (क), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत मंगळवारी दोन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक, शिंदे, पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता सोलंकी, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संकल्प मोकल, अनिल वायाळ, नितीन झाडे, पोलीस हवालदार मुन्ना सिंग यांनी केली.