कौटुंबिक वादातून माहेरी आलेल्या पत्नीवर ब्लेडने हल्ला
हल्ल्यानंतर पतीच्या आत्महत्येचा प्रयत्नाने गिरगावात खळबळ
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून माहेरी आलेली पत्नी सासरी येत नसल्याने रागाच्या भरात पतीनेच पत्नीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला करुन स्वत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी गिरगाव परिसरात घडला. या हल्ल्यात सागर दाजी बेलोसे आणि त्याची पत्नी शीतल सागर बेलोसे ऊर्फ शीतल सुधाकर चव्हाण हे दोघेही जखमी झाले आहे. शीतलवर एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात तर सागरवर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शीतलच्या जबानीवरुन आरोपी पती सागरविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहै. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याने त्याच्यावर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. दरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेने गिरगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना सोमवारी ५ ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास गिरगाव येथील खाडिलकर रोडवर घडली. शीतल ही विरार येथे राहत असून गिरगाव येथील एका पत्रिकेच्या दुकानात कामाला होता. तिचे सागरसोबत बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दहा वर्षांचा एक मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून सागर आणि शीतल यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. त्यामुळे ती पतीला सोडून तिच्या माहेरी निघून आली होती. गेल्या एक महिन्यांपासून ती तिच्या माहेरीच राहत होती. तिने पुन्हा सासरी यावे यासाठी सागरकडून प्रयत्न सुरु होते, मात्र तिच्याकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याच्याशी बोलण्याचा ती टाळत होती. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. सोमवारी सकाळी शीतल ही नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. खाडिलकर मार्गावर आल्यानंतर सागरने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. तिची समजूत काढून तिला घरी येण्यास सांगत होता, मात्र तिने त्याच्यासोबत घरी येण्यास नकार दिला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिच्या गळ्यावर आणि चेहर्यावर ब्लेडने वार केले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या हल्ल्यानंतर त्याने ब्लेडने स्वतच्या हाताची नस कापली.
गर्दीच्या वेळेस हा प्रकार घडल्याने स्थानिक रहिवाशांनी तातडीने सागरला ताब्यात घेऊन ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली. ही माहिती मिळताच व्ही. पी रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या या पती-पत्नींना पोलिसांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये केले. शीतलवर अतिदक्षता विभागात तर सागरवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहै. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही माहिती नंतर दोन्ही कुटुंबियांना देण्यात आली होती. शीतलची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून तिच्याच तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.