मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – कुर्ला आणि गोरेगाव परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत चौदा आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोरेगाव आणि विनोबा भावे नगर पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. यातील एका गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले तर पळून गेलेल्या दुसर्या आरोपीचा गोरेगाव पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३६ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून तिला एक सतरा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही मुलगी अंडी आणण्यासाठी किराणा दुकानात गेली होती. यावेळी तिथे असलेल्या एका २५ वर्षांच्या तरुणाने अश्लील चाळ तिचा विनयभंग केला होता. तिच्या पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिने तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यामुळे ते दोघेही या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी त्याने तिच्या आईला मारहाण केली तर वडिलांच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन दुखापत केली होती. या घटनेनंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह मारहाण करणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरी घटना कुर्ला परिसरात घडली. ३८ वर्षांची तक्रारदार महिला भिवंडी येथे राहत असून तिला चौदा वर्षांची मुलगी आहे. २७ जुलैला ही मुलगी शीतल तलावाजवळ असताना सतरा वर्षांच्या मुलाने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. रविवारी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने विनोबा भावे नगर पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सतरा वर्षांच्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविणयात आले आहे. आरोपी भिवंडी येथे राहत असून भाजी विक्रेता म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.