दोन कोटीच्या मागणी करुन ७५ लाख घेताना दोघांना अटक

अनधिकृत मजल्यावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेल्या दोन मजल्यावर कारवाई न करण्यासाठी दोन कोटीची लाचेची मागणी करुन ७५ हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना दोन खाजगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा आणि प्रतिक विजय पिसे अशी या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत के पूर्व महानगरपालिकेचे पदनिर्देशित अधिकारी मंदार अशोक तारी यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच संबंधित अधिकार्‍यांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.

यातील ५८ वर्षांच्या तक्रारदाराच्या मालकीची एक चार मजली इमारत आहे. या इमारतीचे दोन मजले अनधिकृत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी के पश्‍चिम विभागाच्या अधिकार्‍यांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. त्यात तिसर्‍या आणि चौथ्या मजल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोन्ही मजल्यावर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. याच संदर्भात तक्रारदारांनी के-पूर्व विभागाचे पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी त्यांच्याकडे दोन्ही मजल्यावर कारवाई न करण्याची तसेच नियोजित प्लॉट खरेदी केल्यांनतर अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. ही कारवाई न करण्यासाठी मंदार तारी यांनी त्यांच्याकडे दोन कोटीच्या लाचेची मागणी केली होती. लाच दिली नाहीतर इमारतीवर कारवाईची अप्रत्यक्षपणे धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी दोन कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवून मंदार तारी यांच्याविरुद्ध ३१ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात मंदार तारी यांनी तक्रारदाराकडून दोन कोटीची मागणी करुन अनधिकृत मजले न तोडण्याचे तसेच नियोजित प्लॉट खरेदी केल्यानंतर अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी लाचेचा ७५ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. त्यामुळे तक्रारदार ७५ लाख रुपये घेऊन तिथे गेले होते. यावेळी मंदार तारी यांच्या वतीने मोहम्मद शेहजादा आणि प्रतिक पिसे यांनी लाचेची ही रक्कम घेतली होती. यावेळी या दोघांनाही तिथे सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाचेची रक्कम घेताना अटक केली. चौकशीत त्यांनी मंदार तारी यांच्या वतीने ही लाचेची रक्कम घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

या तिघांविरुद्ध पोलिसांनी ७, ७ अ, भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत लवकरच मंदार तारी यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर वरिष्ठांना अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंदार तारी यांनी दोन कोटीची लाचेची मागणी करुन त्यांच्या वतीने ७५ लाखांची लाच घेताना दोन खाजगी व्यक्तींना अटक केल्याचे वृत्त समजताच के-पूर्व महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलीस उपआयुक्त राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया नटे व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page