मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील चौकडीला अटक

आरोपींकडून पावणेचार लाखांचे ७५ चोरीचे मोबाईल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील चौकडीला ओशिवरा आणि डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून या चारही आरोपींकडून पोलिसांनी पावणेचार लाख रुपयांचे ७५ हून अधिक मोबाईल हस्तगत केले आहेत. मोहम्मद साबीर अहमद शेख ऊर्फ साबीर बाकडा, अफजल मुस्ताक शहा, साबीर इरफान खान आणि उर्मिला प्रकाश मौर्या ऊर्फ पिंकी अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या काही दिवसांत पश्‍चिम उपनगरात मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत झोनमधील सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अशा गुन्हेगारांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार सुनिल खैरे, पोलीस हवालदार आनंद पवार, सिद्धार्थ भंडारे, धनंजय जगदाळे, पोलीस शिपाई राजेंद्र चव्हाण, सुजय शेरे, योगेश नागरे, सोनूसिंह पाटील यांनी आरोपींचा सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अफजल शहा आणि साबीर खान या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून उर्मिला ऊर्फ पिंकी हिचे नाव समोर आले होते. त्यानंतर तिला दुसर्‍या दिवशी पोलिसांनी अटक केली. या तिघांच्या चौकशीत ते तिघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांनी अनेक ठिकाणाहून मोबाईल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लाख पंधरा हजार रुपयांचे ५९ चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. साबीर आणि अफजल हे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसर्‍या कारवाई मोहम्मद साबीर अहमद शेख ऊर्फ साबीर बाकडा या ४२ वर्षांच्या आरोपीस डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे सोळाहून अधिक मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत एक लाख साठ हजार रुपये इतकी आहे. मोहम्मद साबीर हा जोगेश्‍वरी परिसरात राहत असून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अलीकडेच अंधेरी येथे मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छींदर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल घाडगे, पोलीस हवालदार पाटील, गायकवाड, हळवे, पोलीस शिपाई पांढरे, रांजणे यांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन मोहम्मद साबीरला अटक केली. चौकशीत त्याने अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड परिसरात अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली देताना चोरीचे सोळा मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध मेघवाडी, जोगेश्‍वरी, डी. एन नगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छींदर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page