चौदा लाखांचे १४० मोबाईल मूळ मालकांना परत
पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्याकडून मुलुंड पोलिसांचे कौतुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चोरीसह गहाळ झालेले सुमारे चौदा लाख रुपयांचे १४० मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. एका कार्यक्रमांत संबंधित मोबाईल परत देण्यात आले. चोरीसह गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी मुलुंड पोलिसांचे आभार व्यक्त केले होते.
गेल्या काही महिन्यांत मुंबई शहरात चोरीसह गहाळ होणार्या मोबाईलच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. याबाबत अनेक तक्रारदारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करुन त्यांचे मोबाईल शोधून देण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. या वाढत्या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दळवी यांनी गंभीर दखल घेत झोनमधील सर्व पोलीस ठाण्यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरसे, पोलीस हवालदार चेतन उरणकर, महिला पोलीस शिपाई रुपाली हाडवळे यांनी अशा मोबाईलचा शोध सुरु केला होता. मानवी कौशल्य, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने वेगवेगळ्या शहरातून १४० हून अधिक चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून काढले. या मोबाईलची किंमत सुमारे चौदा लाख रुपये आहे. या मोबाईलच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना त्याचे चोरीसह गहाळ झालेले मोबाईल एका कार्यक्रमांत परत करण्यात आले होते.
मोबाईल पुन्हा मिळतील अशी कोणालाही शाश्वती नव्हती. मात्र मुलुंड पोलिसांनी विशेष परिश्रम घेऊन या मोबाईलचा शोध घेऊन ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले. त्यामुळे मुलुंड पोलिसांचे सर्वच तक्रारदारांनी विशेष आभार मानले होते. दुसरीकडे या कामगिरीबाबत पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जोशी यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरसे, पोलीस हवालदार चेतन उरणकर, महिला पोलीस शिपाई रुपाली हाडवळे यांचे कौतुक केले होते.