मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्या अल्पवयीन मुलीचा मोबाइ्रल चोरी करुन पळून गेलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या रिक्षाचालकाला आंबोली पोलिसांनी अटक केली. समशेर ऊर्फ जावेद सलीम शेख असे या ३७ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. समशेर हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१७ वर्षांची तक्रारदार मुलगी अंधेरीतील मोगरापाडा परिसरात राहते. मंगळवारी ६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता ती जोगेश्वरीतील एस. व्ही रोड, मालकाम बाग परिसरातून जात होती. यावेळी तेथून जाणार्या एका रिक्षाचालकाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पलायन केले. तिने रिक्षाचालकाचा पाठलाग केला, मात्र रिक्षाचालकाने वेडीवाकडी रिक्षा चालविल्याने तिला दुखापत झाली होती. त्यानंतर रिक्षाचालक तिचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. घडलेला प्रकार तिने आंबोली पोलिसांना सांगून रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध ३०९ (४) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पवार, पोलीस हवालदार गोरखनाथ पवार, प्रदीप कुलट, शिल्पेश कदम, सचिन साखरे, गणेश मेश्राम, योगेश नरळे यांनी आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने जुहू गल्ली येथून समशेर ऊर्फ जावेद शेख याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या मुलीचा मोबाईल चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. शमशेर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आंबोली, जुहू, वर्सोवा पोलीस ठाण्यात चारहून अधिक रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.