मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – धनजी स्ट्रिट परिसरातील एका ज्वेलर्स व्यापार्याची त्याच्याच कॉलेज मित्राने सुमारे ६७ लाखांची फसवणुक केली. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपी व्यापारी मित्राला अखेर बोरिवली येथून एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. श्रेयांश मदनलाल गोलेचा असे या ४२ वर्षांच्या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यासह हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन ज्वेलर्स व्यापारी मित्राची फसवणुक केल्याचा श्रेयांशवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकेश अशोक चोपडा हे अंधेरी येथे राहत असून त्यांचा हर्ष ज्वेल्स नावाचा धनजी स्ट्रिट परिसरात हिरे आणि हिरेजडीत सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. चौदा वर्षांपूर्वी त्यांचे बीकॉमचे शिक्षण पूर्ण झाले होते. शिक्षण घेताना वसतिगृहात राहत असताना त्यांची श्रेयांशशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकेशने सोने आणि हिर्यांचा व्यवसाय सुरु केला होता. गेल्या सोळा वर्षांपासून ते व्यवसायात असून चार वर्षांपूर्वी त्यांनी स्वतचा हर्ष ज्वेल्स दुकान सुरु केले होते. दहा वर्षांपूर्वी त्यांची श्रेयांशशी पुन्हा भेट झाली होती. यावेळी त्यांना त्याचा धनजी स्ट्रिट येथे हिरे आणि सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यात व्यवहार सुरु झाला होता. अनेकदा श्रेयांशने त्यांच्याकडून क्रेडिटवर हिरे आणि दागिने घेतले होते, त्याचे वेळेवर पेेमेंट करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. जानेवारी २०२० रोजी त्याने त्यांना मोठी ऑर्डर मिळाली असून त्यांच्याकडे क्रेडिटवर हिरे आणि हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला २९ जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सुमारे ७२ लाख रुपयांचे ३०९ कॅरेटचे सुट्टे हिरे, ५९ ग्रॅम वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागिने दिले होते. तीस दिवसांत त्याने संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना सव्वापाच लाखांचे पेमेंट केले होते. मात्र उर्वरित ६७ लाखांचे पेमेंट त्याच्याकडून आले नव्हते. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. त्यामुळे ते त्याच्या दुकानात गेले होते, यावेळी त्यांना त्याचे दुकान बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर जवळपास एक ते दिड वर्ष श्रेयांश हा गायब झाला होता.
काही महिन्यांपूर्वी त्यांना त्याचा नवीन मोबाईल क्रमांक मिळाला होता. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधून उर्वरित पेमेंटबाबत विचारणा केली, मात्र त्याने त्यांना पेमेंट केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी श्रेयांशविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला शनिवारी बोरिवलीतील नेन्सी कॉलनी परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.