मद्यप्राशन करुन पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारचालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मद्यप्राशन करुन कार चालवून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शैलेशकुमार राजेंद्र सिंह नावाच्या एका ३६ वर्षांच्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

ही घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, रावळपाडा ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर घडली. शैलेशकुमार सिंह हा नालासोपारा येथील वसई लिंक रोड, जय विजय गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. शुक्रवारी रात्री मद्यप्राशन करुन तो कार चालवत होता. यावेळी त्याने एका बाईकस्वाराला धडकदिली होती. यावेळी तिथे उपस्थित वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस हवालदार स्वप्निल वसंत घरत यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघातानंतर त्याने पलायन केले होते. रावळपाडा ब्रिजजवळील दक्षिण वाहिनीवर कार थांबवून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. स्वप्निल घरत यांच्या अंगावर धावून त्यांची वर्दी उतरविण्याची धमकी दिली. त्यांच्याशी धक्काबुक्की करुन त्यांच्यासह पोलीस हवालदार म्हात्रे यांची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार समजताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी स्वप्निल घरत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शैलेशकुमार सिंह याच्याविरुद्ध १३२, ३५१ (२), ३५२, २८१ भारतीय न्याय सहिता सहकलम १७९, १८४, १८५ मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page