मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – टॉवर वॅगन व्हॅनच्या धडकेने रविंद्र बाळासाहेब हाके या पोलीस शिपायाचा रविवारी सकाळी विक्रोळी-कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान मृत्यू झाला. गावाहून कुटुंबियांना मुंबईत आणल्यानंतर त्यांच्यासाठी घर शोधणे रविंद्र हाके याच्यासाठी शेवटचे ठरले. त्याच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.
पुण्याचा इंद्रापूर, मदनवाडीचा रहिवाशी असलेला रविंद्र हा ताडदेवच्या लोकल आर्म्स एकमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. पोलीस खात्यात नोकरी लागल्यानंतर त्याने एक वर्षांपूर्वी विवाह केला होता. पाच दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता. त्याला त्याच्या कुटुंबियांना मुंबईत आणायचे होते. त्यासाठी तो घराचा शोध घेत होता. त्याच्या मित्राने त्याला विक्रोळी येथे घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी तो विक्रोळी येथे घर पाहण्यासाठी मित्राकडे गेला होता. यावेळी त्याने विक्रोळी-कांजूरमार्ग येथील काही म्हाडा घर पाहिले होते. तिथेच घर घेण्याचा त्याने निर्णय घेतला होता. शनिवारी रात्रपाळी करुन तो सकाळी विक्रोळी येथे आला होता. विक्रोळी-कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान रुळावरुन जाताना त्याला एका टॉवर वॅगन व्हॅनने धडक दिली. मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक असल्याने ही टॉवर वॅगन व्हॅन आणली होती. यावेळी मोटारमनने तीन वेळा हॉर्न वाजविला. मात्र कानात ईअर फोन लावल्यामुळे त्याला हॉर्नचा आवाज आला नसावा असा अंदाज आहे.
अपघातात जखमी झालेल्या रविंद्रला रेल्वे पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉ. सुनिल इनामदार यांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली. ही माहिती नंतर त्याच्या पुण्यातील कुटुंबियांना देण्यात आली होती. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. कुटुंबियांसाठी घर शोधणे रविंद्र हाके याला शेवटचे ठरले, त्याच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईक, मित्रमंडळी आणि पोलीस मित्रांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.