अकरा व सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
सांताक्रुज-घाटकोपरची घटना; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अकरा आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीचा त्यांच्याच परिचित व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना सांताक्रुज व घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला आणि पंतनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका ४३ वर्षांच्या आरोपीस अटक केली तर सतरा वर्षांच्या आरोपी मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कॅबिन क्रु म्हणून काम करते. तिला अकरा वर्षांची मुलगी असून आरोपी हा तिचा जवळचा मित्र आहे. २५ मेला त्याने तिच्या मुलीला आईस्क्रिम खाण्यासाठी कालिना येथे बाईकवरुन आणले होते. यावेळी बाईकवरुन त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिचा विनयभंग करुन त्याने हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले. अलीकडेच हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजला होता. त्यामुळे तिने तिच्या मित्राविरुद्ध वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मित्राविरुद्ध ३५४ भादवीसह ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला शनिवारी वाकोला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसरी घटना घाटकोपरच्या पंतनगरातील एका कॉलेजमध्ये घडली. सतरा वर्षांची तक्रारदार मुलगी ही घाटकोपर येथे राहत असून एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. आरोपी तिच्या शाळेत शिकत होता, त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. तो तिचा सतत पाठलाग करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिने बोलण्यास नकार देताच त्याने तिला अनेकदा मारहाण करुन तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांनी त्याने तिचा पुन्हा पाठलाग करुन तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी ७८, ११५ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सतरा वर्षांच्या आरोपी मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला नंतर त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते.