गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देतो सांगून कोट्यवधींचा गंडा
दोनशे कोटीची फसवणुक; दोन वॉण्टेड आरोपी गजाआड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – स्पॉन्जी, भिशीसह शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देतो असे सांगून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्या कटातील दोन वॉण्टेड आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलला यश आले आहे. मणिक्कम वेलायुथम उडैयार आणि माधयन मुरगेसन उडैगार अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने शनिवार १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन झालीद आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत आशिष दिनेशकुमार शहा याला पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींनी फसवणुकीच्या पैशांतून मोठ्या प्रमाणात प्रॉपटी खरेदी केली असून त्यापैकी सुमारे नऊ कोटीची प्रॉपटी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीने आतापर्यंत मुंबईसह मिरा-भाईंदर, तामिळनाडू येथे ४०० ते ५०० लोकांची सुमारे दोनशे कोटीची फसवणुक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची आशिष शहाशी ओळख झाली होती. त्याने त्याची सेबी रजिस्टर्ड खाजगी कंपनी असून ही कंपनीत शेअरमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करते. या गुंतवणुकीवर कंपनीने अनेकांना चांगला नफा मिळवून दिला आहे. याच पैशांतून त्याने ऑफिस, फ्लॅट, वाहन आणि सोने खरेदी केले होते. गुंतवणुकीवर वर्षांला ८४ टक्के परवाता देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आमिषाला बळी पडून या व्यावसायिकाने त्याच्याकडे सुमारे अकरा कोटी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने परताव्यासह मूळ न देता त्यांची फसवणुक केली होती. अंधेरीतील वर्सोवा येथील फ्लॅट बंद करुन आशिष शहा हा पळून गेला होता. चौकशीदरम्यान त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे तक्रारदार व्यावसायिकाच्या लक्षात आले होते. या घटनेनंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आशिषसह इतराविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०९, ४२० भादवी सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आशिष शहा याला १० जुलैला मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले. त्याच्या चौकशीतून त्याच्या काही सहकार्यांची नावे समोर आली होती. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपटी सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक अरुण थोरात, प्रविण मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, पोलीस हवालदार अशोक शिंदे, अमोल तोडकर, शेंदरकर, सचिन ननावरे, पोलीस शिपाई मयुर थोरात, साळुंखे यांनी वॉण्टेड असलेल्या मणिक्कम उडैयार आणि माधयन उडैयार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. या दोघांकडून पोलिसांनी ५५ लाखांचे एक फॉरच्यूनर आणि एमजी हेक्टर कार, दोन मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर या दोघांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी आशिष शहाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तीन महागड्या कारसह दोन मोबाईल, १ किलो ९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५० ग्रॅम वजनाचे ३२ व शंभर ग्रॅम वजनाचे तीन बार, चार सोन्याचे बिस्कीट, २५ लाखांची कॅश आणि चार फ्लॅट असा सुमारे नऊ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने स्पॉन्जी, भिशीसह शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देतो असे सांगून आतापर्यंत अनेकांची फसवणुक केली होती. जवळपास पाचशे लोकांची दोनशे कोटीची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह मिरा-भाईंदर, तामिळनाडू येथे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.