बोगस नियुक्तीपत्र सादर करुन अमेरिकेचा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न
केरळच्या तरुणाला अटक तर इतर दोन आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – खाजगी कंपनीचे बोगस नियुक्तीपत्र सादर करुन अमेरिकेचा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विबीन वलसन चलचिरा या ३३ वर्षांच्या केरळच्या तरुणाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. त्याला बोगस नियुक्तीपत्र बनवून देणार्या विकास आणि सुनिल यांचा पोलिसांकडून शोध सुरु असून या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. अटकेनंतर बिवीनला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
जेम्स बिलीगटन हे वांद्रे येथील बीकेसीमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावास कार्यालयात ओव्हर सिझ क्रिमिनल इन्व्हेस्टीगेटर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कार्यालयात मुंबईसह देशभरातील काही नागरिक अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करतात. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर संबंधित उमेदवाराला दूतावास कार्यालयात मुलाखतीसाठी बोलाविले जाते. बिवीन चलचिरा हा मूळचा केरळच्या त्रिशुल, मुगुदंपुरम, नंदीपुलमचा रहिवाशी असून त्याने काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या व्हिसासाठी बीकेसी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जानंतर त्याला मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता तिथे मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे तो मंगळवारी तिथे मुलाखतीसाठी आला होता. त्याच्याकडील मूळ कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकार्याला त्याने सादर केलेल्या खाजगी कंपनीचे नियुक्तीपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले होते. या बोगस कागदपत्रांविषयी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याला ते कागदपत्रे विकास आणि सुनिल नावाच्या व्यक्तींनी दिल्याचे सांगितले. याच कागदपत्राच्या आधारे त्याने व्हिसासाठी अर्ज केला होता. अशा प्रकारे त्याने कंपनीचे बोगस नियुक्तीपत्र सादर करुन संबंधित कार्यालयाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
याप्रकरणी जेम्स बिलीगटन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बिवीनसह इतर दोघांविरुद्ध बोगस कागदपत्रे सादर करुन फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर बिवीनला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत विकास आणि सुनिल या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुुरु आहे.