बहिणीने पोलिसांत तक्रार म्हणून भावी पत्नीची बदनामीचा प्रयत्न
अश्लील फोटो व्हारयलची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – कौटुंबिक कारणावरुन पतीसोबत झालेल्या वादानंतर संपूर्ण कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार केली म्हणून भावी पत्नीची बदनामीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार परिसरात उघडकीस आला आहे. तक्रार मागे घेतली नाहीतर तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात दोन बंधूंसह एका मित्राचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अब्दुल्ला, एजाज अहमद शेख आणि आरिफ अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
२२ वर्षांची तक्रारदार तरुणी ही साकिनाका येथे तिची आई आणि दोन बहिणीसोबत राहते. तिला एक भाऊ असून तो नोकरीनिमित्त सौदी अरेबिया येथे असतो. तिची एक बहिण विवाहीत असून तिचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती त्यांच्यासोबत राहते. तिचा अब्दुल्ला हा दिर असून नातेवाईक असल्याने ते दोघेही एकमेकांच्या चांगल्या परिचित आहेत. नोव्हेंबर २०२१ रोजी ती तिच्या बहिणीच्या मुंब्रा येथील घरी राहण्यासाठी गेली होती. यावेळी तिचे डोक दुखत होते. त्यामुळे तिला अब्दुल्लाने डोकेदुखीवर एक गोळी दिली होती. ही गोळी घेतल्यानंतर तिने गुंगी आली होती. काही वेळानंतर ती बेशुद्ध झाली होती. यावेळी अब्दुल्लाने तिच्याशी अश्लील चाळे करत असल्याचे त्याच्या मोबाईलवर काही फोटो काढले होते. याबाबत तिला काहीच माहिती नव्हती. काही दिवसांनी त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाविषयी बोलणी सुरु झाली होती. त्यामुळे ती अब्दुल्लाच्या कॉलसह व्हॉटअपच्या माध्यमातून संपर्कात होती. यावेळी तो तिच्याकडे तिचे अश्लील फोटोची मागणी करत होता. मात्र तिने त्याला तिचे अश्लील फोटो पाठविण्यास नकार दिला. यावेळी त्याने तिला तिचे काही फोटो माझ्याकडे असल्याचे सांगितले. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला तिचे काही अश्लील फोटो दाखविले. ते फोटो पाहिल्यांनतर तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तो तिच्याकडे सतत अश्लील फोटोची मागणी करत होता. तिने फोटो पाठविले नाहीतर तिचे आधीच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे तिने त्याला तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते.
याच दरम्यान तिच्या बहिणीचे तिच्या पतीसोबत वाद झाले होते. त्यामुळे तिने पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. त्यात अब्दुल्ला शेख याचेही नाव होते. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग होता. त्यामुळे त्याने तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. तिचे फोटो त्याने त्याच्या भाऊ एजाज आणि मित्र आरिफ या दोघांना पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी त्याने ते फोटो तिच्या सौदीला असलेल्या भावाला पाठवून त्यांच्याविरुद्ध तिच्या बहिणीने केलेली तक्रार मागे घ्या नाहीतर तिचे तिच्या बहिणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकाराने तक्रारदार तरुणीसह तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. यासंदर्भात घरातच चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगून अब्दुल्ला, त्याचा भाऊ एजाज आणि मित्र आरिफ यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध ७५ (२), ७७, ३५१ (२), ३ (५), १२३ भारतीय न्याय सहिता सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.