नाकाबंदीदरम्यान एमडी ड्रग्ज तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश
दोन कोटी नऊ लाखांच्या एमडी ड्रग्ज व कारसह तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुलुंड येथे नाकाबंदी सुरु असताना नवघर पोलिसांच्या एका विशेष पथकाने एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करुन एका २७ वर्षांच्या तरुणाला अटक केली. मोहम्मद कलीम सलीम चौधरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन कोटी दोन लाख नव्वद हजार रुपयांचे दोन किलो एकोणतीस ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि पाच लाखांची मारुती सुझुकी कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत साकिब नावाच्या तरुणाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर दिला होता. मंगळवारी उशिरा नवघर पोलिसांनी परिसरात अचानक नाकाबंदी सुरु केली होती. ही नाकाबंदी सुरु असताना मुलुंडच्या ऐरोली टोलनाका, साऊथ बॉंण्डवर एक कार संशयास्पद येताना पोलिसांना दिसली. त्यामुळे या कारचालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला होता. यावेळी कारमध्ये असलेल्या मोहम्मद कलीमला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारची झडती घेतली होती. त्यात या अधिकार्यांना २ किलो २९ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या एमडी ड्रग्जची किंमत दोन कोटी दोन लाख नव्वद हजार इतकी आहे. या ड्रग्जसहीत पाच लाखांची कार नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मोहम्मद कलीम हा कुर्ला येथील हलावपुल, गाजीमियॉं दर्ग्याजवळील इक्बाल चाळीत राहतो. त्याला ते ड्रग्ज साकिब नावाच्या एका व्यक्तीने दिले होते. साकिब हादेखील कुर्ल्याचा रहिवाशी आहे. एमडी ड्रग्जची विक्रीसाठी जाताना त्याला नवघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे एमडी ड्रग्ज विक्रीचा त्याचा प्लान फसला गेला. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत सकाळी त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला दुपारी मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद कलीम आणि साकिब या दोघांनाही ते एमडी ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला विक्री करणार होते, त्यांनी यापूर्वीही एमडी ड्रग्जची विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा नवघर पोलीस तपास करत आहेत. नाकाबंदीत एमडी ड्रग्जचा पर्दाफाश करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक चौहाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडवे, पोलीस उपनिरीक्षक दणाने, सहाय्यक फौजदार डोलकर, पोलीस हवालदार पाटील, वाकचौरे, जाधव, सावंत, पाटील, सय्यद, खेडकर, यादव, पोलीस शिपाई राठोड, पाटील यांचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कौतुक केले आहे.