डिलीव्हरीसाठी दिलेल्या मोबाईलसह इतर साहित्यांचा अपहार

चार महिन्यानंतर गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन डिलीव्हरी बॉयला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – डिलीव्हरीसाठी दिलेल्या मोबाईलसह मोबाईल ऍसेसेरीज, ब्लूट्यूथ, कपडे, शूज, ब्युटी प्रोडेक्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी आदी सुमारे साडेअकरा लाख रुपयांच्या महागड्या वस्तूंचा अपहार करुन कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा अखेर मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या रोहित रामचंद्र नागपुरे या २६ वर्षांच्या आरोपीस चार महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सात मोबाईल हस्तगत करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल गोवर्धन इंगोले हे कांदिवलीतील इराणीवाडी, सोनाबाई चाळीत राहतो. मालाडच्या काचपाडा, सोनल इंडस्ट्रिजच्या सॅडोफॅक्स टेक्नोलॉजिस प्राव्हेट लिमिटेड कंपनीत असोशिएट लीड म्हणून काम करतो. या कंपनीचे मुख्य कार्यालय बंगलोर येथून इतर शहरात कंपनीच्या शाखा आहेत. मुंबईतील शाखेत २८ कर्मचारी काम करत असून त्यात २५ डिलीव्हरी बॉयचा समावेश आहे. ही कंपनीत ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या सामानाची डिलीव्हरी करते. सकाळी डिलीव्हरी बॉयला डिलीव्हरीचे सामान दिल्यानंतर सायंकाळी त्यांच्याकडून रिपोर्ट घेतला जातो. अनेकदा ग्राहक ते सामान घेण्यास नकार देतात किंवा ग्राहक डिलीव्हरीच्या वेळेस घरी नसतात. त्यामुळे ते पार्सल पुन्हा कार्यालयात जमा केले जाते. १ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ग्राहकांनी वस्तू घेण्यास नकार दिल्याने तसेच काही ग्राहक घरी मिळून न आल्याने त्यांचे पार्सल कार्यालयात जमा करण्यात आले होते. या बॉक्सची पाहणी केल्यानंतर आतील काही महागड्या वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यात ३३ हून महागड्या मोबाईलसह मोबाईल ऍसेसेरीज, ब्लूट्यूथ, कपडे, शूज, ब्युटी प्रोडेक्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी आदी सुमारे साडेअकरा लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. हा प्रकार निदर्शनास येताच विशाल इंगोले याने हा प्रकार त्याच्या वरिष्ठांना सांगितली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याला पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याने कंपनीच्या वतीने मालाड पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मालाड पोलिसांनी कंपनीच्या अज्ञात डिलीव्हरी बॉयविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. तपासादरम्यान कंपनीच्या प्रत्येक डिलीव्हरी बॉयची चौकशी करुन त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. यावेळी पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. या माहितीनंतर तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी रोहित नागपुरे या डिलीव्हरी बॉयला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली देताना अपहार केलेले सात मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने बॉक्समधील महागड्या वस्तू काढून खाली बॉक्स कार्यालयात जमा केले होते. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून त्याने पुरेपुरे काळजी घेतली होती, अखेर चार महिन्यानंतर या गुन्ह्यांचा पोलिसांनी पर्दाफाश करुन आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून उर्वरित मुद्देमाल लवकरच त्याच्याकडून हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page