चुकून दुसर्‍या खात्यात ट्रान्स्फर झालेली कॅश परत मिळाली

तक्रारदार व्यावसायिकाने मानले एमएचबी पोलिसांचे आभार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मित्राच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी आरटीजीएस करताना चुकून दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्स्फर झालेली सुमारे पाच लाखांची कॅश एमएचबी पोलिसांच्या सायबर सेलने परत मिळवून दिली. ४८ तासांत संपूर्ण कॅश बँक खात्यात जमा झाल्याने तक्रारदार व्यावसायिकाने एमएचबी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

दिपक पुरुषोत्तम खानचंदानी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील देवीदास लेन, इंद्र पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या एका मित्राने वडिलांच्या ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी आरटीजीएसद्वारे मित्राला पाच लाख रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम मित्राऐवजी दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. शेवटच्या दोन अंकामध्ये चूक झाल्याने ही रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली नव्हती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार करुन ही रक्कम परत मिळविण्यास मदत करण्याची विनंती केली होती. त्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तपास सुरु केला होता.

तपासात दिपक खानचंदानी यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांच्या खात्यात ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्याची नंतर माहिती काढण्यात आली होती. त्यामुळे संबंधित बँक अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करण्यात आले. पाच लाखांची ही कॅश यश जोशी याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. तो गुजरातच्या वडोदराचा रहिवाशी असून पैशांविषयी कुठलीही शहानिशा न करता त्याने ती रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. त्यामुळे त्याला संपर्क साधून त्याला ही रक्कम पुन्हा संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. त्याने शेअरमध्ये ही रक्कम गुंतवणुक केली होती, तो व्यवहार रद्द करुन त्याने पाच लाख रुपये पुन्हा दिपक खानचंदानी यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले.

अशा प्रकारे तक्रार प्राप्त होताच अवघ्या ४८ तासांत ही रक्कम तक्रारदारांना परत मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांचे आभार व्यक्त केले होते. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page