मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – इडली गुरु सेंटरची फे्रन्चाईस देण्याचे आमिष दाखवून एका पिता-पूत्राची सुमारे २८ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कार्तिक बाबू शेट्टी आणि मंजुला कार्तिक शेट्टी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी फ्रेन्चाईसच्या नावाने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून याच गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारे इतर गुन्हे केल्याचे बोलले जाते.
आदित्य मुकेश कपूर हे अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरात राहत असून फिल्म मेकर आहेत. त्यांचे वडिल कोलकाता येथे वास्तव्यास असून त्यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. जानेवारी २०२४ रोजी ते वर्सोवा येथील इडली गुरु हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी तिथे नास्ता करताना त्यांना इडली गुरु सेंटरच्या फ्रेन्चाईसंदर्भातील बोर्ड वाचण्यात आला होता. त्यात इडलीगृहाची फे्रन्चाईस कार्तिक शेट्टी यांच्या मालकी असल्याचे दिसून त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक होता. हा मोबाईल क्रमांक त्यांनी त्यांच्या वडिलांना पाठविला होता. त्यांनतर त्यांनी कार्तिकला संपर्क साधला होता. इडली गुरु फे्रन्चाईससंदर्भात त्यांनी त्याच्याशी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी कार्तिकने त्यांना कोलकाताऐवजी मुंबई शहरात फे्रन्चाईस देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मुकेश कपूर हे मुंबईत आले होते. काही दिवसांनी अंधेरीतील सात बंगला मेट्रो स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये त्यांची कार्तिकची भेट झाली होती. यावेळी त्याची पत्नी मंजुळा शेट्टी हीदेखील तिथे उपस्थित होती. याच भेटीत त्यांनी त्यांना त्यांच्या ईडलीगृहाची महिन्यांची उलाढाल २८ ते ३० लाखांची असल्याचे सांगितले होते. त्यांची फे्रन्चाईस घ्यायची असेल तर त्यांना आधी एक शॉप भाड्याने घ्यावे लागतील. शॉपचे नूतनीकरणासह इतर सर्व खर्च त्यांनाच करावा लागेल असे सांगितले. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर या दोघांनी त्यांना अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात फ्रेन्चाईस देतो असे सांगितले.
फे्रन्चाईससह जीएसटीसाठी त्यांना २३ लाख ६० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी शॉपचा शोध सुरु केला होता. यावेळी त्यांना लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये शॉप सापडले नाही. त्यामुळे त्यांनी जोगेश्वरीची एक जागा भाड्याने घेतली होती. काही दिवसांनी त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी कार्तिकला टप्याटप्याने २३ लाख ६० हजार रुपये तसेच पाच लाख रुपये शॉपच्या नूतनीकरणासाठी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फे्रन्चाईस दिले नाही. विचारणा करुनही तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर कार्तिक व त्याची पत्नी मंजुळा यांनी त्यांचे मोबाईल घेणे बंद केले होते. याच दरम्यान त्यांना सोशल मिडीयावर कार्तिक, मंजुळा आणि त्यांच्या वडिलांनी अशाच प्रकारे इतर लोकांची फसवणुक केली असून त्यांच्याविरुद्ध काही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत कार्तिक, त्याची पत्नी मंजुळा आणि वडिल बाबू शेट्टी यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजली होती.
मार्च २०२४ रोजी कार्तिक त्यांना भेटला आणि त्याने त्याच्याविरुद्ध दाखल झालेला बोगस असून त्याची निर्दोष सुटका झाल्याचे सांगितले. मात्र त्याने फे्रन्चाईन न दिल्याने त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. अशा प्रकारे मंजुळा आणि कार्तिक शेट्टीने इडली गुरु सेंटरची फे्रन्चाईस देतो असे सांगून त्यांची २८ लाख ६० हजाराची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कार्तिक आणि मंजुळा शेट्टीविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.