एलओसीवर असलेल्या व्यावसायिकाला पाच वर्षांनी अटक

ब्रॉस-कॉपरच्या जागी सिमेंट गोणी पाठवून साडेतीन कोटीची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ऑर्डर दिलेल्या ब्रॉस आणि कॉपरच्या जागी सिमेंट गोणी पाठवून एका नामांकित कंपनीची साडेतीन कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी लुक आऊट नोटीसवर असलेल्या सिंगापूरच्या व्यावसायिकाला पाच वर्षांनी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. हेम प्रभाकर शाह असे या ५५ वर्षांच्या व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत हेम शाहच्या इतर व्यावसायिक सहकार्‍यांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून ते सध्या विदेशात राहतात. त्यांच्याविरुद्धही पोलिसांनी एलओसी जारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार शरदकुमार प्रदीपकुमार केजरीवाल हे व्यावसायिक असून चर्चगेट येथील ईश्‍वर भवन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. हेम शाह हा त्यांच्या परिचित व्यावसायिक असून त्याची ए. पी ट्रेडिंग नावाची एक कंपनी आहे. फेब्रुवारी ते जून २०१९ या कालावधीत त्यांनी त्याच्या कंपनीच्या माध्यमातून पीटी सिनार आणि पीटी पूत्रा या कंपनीला ब्रास आणि कॉपरच्या ऑर्डर दिले होते. त्यासाठी त्यांनी या तिन्ही कंपनीला ५ लाख २ हजार ८०१ युएसडी म्हणजे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र या कंपन्यांनी त्यांना ब्रास आणि कॉपर पाठविले नाही. त्याजागी कंपनीने पनवेलच्या मुंबई-गोवा हायवे, पळस्पे व्हिलेजच्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सिमेंटच्या गोणी पाठवून कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याकडे विचारणा सुरु केली होती. तसेच ब्रास आणि कॉपरच्या ऑर्डरसाठी दिलेले साडेतीन कोटी रुपये परत करण्याची विनंती केली होती. मात्र त्याच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी हेम शाहच्या कंपनीसह अन्य दोन्ही कंपन्यांविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पळून गेले होते.

तपासात हेम शहा आणि रामेंद्र हे दोघेही विदेशात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. हेम हा सिंगापूर तर रामेंद्र हा जर्काता पुसत, इंडोनेशिया येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. दुसरीकडे या गुन्ह्यांतील आरोपी विदेशात पळून गेल्याने या गुन्ह्यांचा तपास अ वर्गीकरण करण्यात आला होता. याच दरम्यान मंगळवारी १३ ऑगस्टला हेम शाह हा सिंगापूर येथून अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस असल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन त्याची माहिती आझाद मैदान पोलिसांना दिली. त्यानंतर या पथकाने अहमदाबाद येथून हेम शाहला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले. मुंबईत आणल्यानंतर त्याल फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंतच्या चौकशीत हेम हा सिंगापूरचा नागरिक असून त्यानेच कट रचून ही फसवणुक केली होती. या पैशांचात्याचा कसा विनियोग केला, या गुन्ह्यांत त्याच्यासोबत इतर कोणी सहकारी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. त्याच्या अटकेची माहिती त्याचा अहमदाबादचा रहिवाशी असलेला मेहुणा राकेश भगवानदास दलाल यांना देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page