मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चौदा आणि सोळा वयोगटातील तीन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित तरुणांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना गोवंडी आणि माहीम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवनार आणि माहीम पोलिसांनी तीन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांत एका आरोपीस देवनार पोलिसांनी अटक केली तर एका महिलेसह दोघांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर आरोपी तरुणाला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी चौदा वर्षांची असून ती उत्तरप्रदेशची रहिवाशी आहे. अदनान मीरमोहम्मद शेख हा २५ वर्षांचा तरुण तिच्याच गावचा असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या संबंधातून त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केले होते. आपण लवकरच लग्न असे सांगून तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. मंगळवारी १३ ऑगस्टला तो तिला उत्तरप्रदेशातून मुंबईत घेऊन आला होता. त्यानंतर ते दोघेही गोवंडीतील एका मैदानात राहत होते. तिथेही त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. दोन दिवस राहिल्यानंतर गुरुवारी १५ ऑगस्टला ते दोघेही पुन्हा उत्तरप्रदेशाला जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी तिथे बसलेल्या या पिडीत मुलीला एका एनजीओची पदाधिकारी असलेल्या महिलेने पाहिले. तिची चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. यावेळी ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच तिने ही माहिती टिळकनगर पोलिसांना दिली. हा गुन्हा गोवंडीच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध ७१, १३७ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा तपास देवनार पोलिसांकडे सोपविला होता. गुन्हा दाखल होताच अदनान शेख या २५ वर्षांच्या आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला मानखुर्द येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून ही माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.
दुसर्या घटनेत एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २५ वर्षांच्या आरोपीसह एका महिलेविरुद्ध देवनार पोलिसांनी ३७६, ३६३, ३२८, ३२३, ५०६ (२), ३४ भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पिडीत मुलगी ही गोवंडी येथे राहते. आरोपी हा तिच्या परिचित असून ते दोघेही एकाच परिसरात राहतात. घरगुती कारणावरुन भांडण झाल्यानंतर ती आरोपी महिलेच्या घरी राहण्यासाठी गेली होती. ऑक्टोंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत अपहरण केलेल्या या मुलीला या दोघांनी नशा करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिच्यावर आरोपी तरुणाने जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. विरोध केल्यानंतर तो तिला सतत मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने देवनार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून महिलेसह दोघांविरुद्ध तक्रार केली होती. तपासात २५ वर्षांचा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर, टिळकनगर पोलीस ठाण्यात अपहरणासह गंभीर दुखापतीसह रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी ७०१ सीआरपीसी कलमांतर्गत टिळकनगर पोलिसांनी कारवाई केली होती.
तिसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार ४२ वर्षाचे असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहतात. त्यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे. घाटकोपर येथे राहणार्या मोहम्मद हुसैन या तरुणासोबत तिची ओळख असून त्यांची मैत्री होती. ती अल्पवयीन असल्याचे माहित असून त्याने तिच्यावर एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत माहीम येथील दर्ग्याजवळील गार्डनमध्ये जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिची मासिक पाळी बंद झाल्याने तिच्या वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. यावेळी डॉक्टरांनी पिडीत मुलगी चौदा आठवड्याची गरोदर असल्याने सांगितले. त्यानंतर तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारानंतर त्यांनी घाटकोपर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद हुसैनविरुद्ध ३७६, ३७६ (२), (आय) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर माहीम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.