मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ठराविक रक्कमेच्या कमिशनच्या आमिषाला बळी पडून विदेशातून कोट्यवधी रुपयांचे कोकेन आणल्याप्रकरणी एका विदेशी महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्यांनी अटक केली. या महिलेकडून या अधिकार्यांनी वीस कोटीचे कोकेन जप्त केले असून तिने शॅम्पू बॉटलमधून द्रव्यरुपी कोकेनची तस्करीचा प्रयत्न केला आहे. तिच्याविरुद्ध एनपीडीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत शुक्रवारी दुपारी तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून गोल्ड आणि ड्रग्जच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर अशा तस्कराविरुद्ध तपास यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच विदेशात काहीजण कोकेनची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. सकाळी नैरोबी येथून आलेल्या अशाच एका महिलेला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या सामानाची झडती घेतल्यांनतर त्यात या अधिकार्यांना दोन शॅम्पू आणि लोशनच्या बाटल्या सापडल्या. त्यात तिने द्रव्य स्वरुपात कोकेन तस्करीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत या अधिकार्यांनी १ किलो १९८३ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे वीस कोटी रुपये आहे. कोकेन जप्त करुन तिच्याविरुद्ध या अधिकार्यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. तपासात तिला ते कोकेन नैरोबी येथे एका व्यक्तीने दिले होते. त्यासाठी तिला ठराविक रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तिने ते कोकेन आणले होते. मात्र कोकेनची डिलीव्हरी करण्यापूर्वीच तिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकार्यांनी अटक केली. ते कोकेन ती कोणाला देणार होती याचा आता संबंधित अधिकारी तपास करत आहेत.