मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – घाण पाणी आणि कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादातून शेजारी राहणार्या एका व्यक्तीने ६४ वर्षांच्या महिलेसह तिच्या मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वरळी-कोळीवाड्यात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या रोहन जयवंत वैद्य (३९) आणि त्याची नविता जयवंत वैद्य (६४) यांच्यावर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच आरोपी अशोक मारुती पाटील याला दादर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना बुधवारी १४ ऑगस्टला सायंकाळी साडेसात वाजता वरळी कोळीवाडा, सोनापूर लेन परिसरात घडली. याच परिसरात रोहन हा त्याची आई नविता, वडिल जयवंत, पत्नी दर्शनासोबत राहत असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या शेजारी अशोक पाटील हा त्याच्या पत्नीसोबत राहतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे अशोकसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होते. त्यातून त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. अशोक हा त्यांच्या दारासमोर घाण पाणी आणि कचरा टाकून वैद्य कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. १४ ऑगस्टला रोहन हा कामावर घरी आला होता. यावेळी अशोक हा त्याची आई नविता आणि पत्नी दर्शनासोबत वाद घालत असल्याचे त्याच्या लक्षात आले. चौकशी केल्यानंतर अशोकने पुन्हा त्यांच्या घरासमोर घाण पाणी आणि कचरा टाकला होता. त्याचा जाब विचारला म्हणून अशोकने त्यांच्याशी वाद सुरु होता. याच वादानंतर त्याने कोयत्याने नविता यांच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केले. यावेळी रोहनने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने त्याच्या हातावर कोयत्याने वार केले.
अशोक हा प्रचंड आक्रमक झाला होता. त्यामुळे रोहनने त्याला घरात ढकळून बाहेर कडी लावून घेतली होती. कोयत्याने हल्ला केल्यानंतर रोहन आणि त्याची आई नविता हिला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांनी दादर पोलिसांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होूती. यावेळी अशोक पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी रोहनच्या तक्रारीवरुन अशोकविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.